भुसावळात बिस्किटाच्या बहाण्याने चिमुकलीचे अपहरण
भुसावळ : बिस्कीट देण्याच्या बहाण्याने 12 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची घटना भुसावळात घडली. या प्रकरणी एका संशयीताविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्हीच्या आधारावर आरोपीसह बेपत्ता बालिकेचा शोध सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, पालकांनी आपल्या पाल्यांकडे लक्ष द्यावे तसेच अनोळखी संशयास्पद व्यक्ती फिरताना आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस दलाने केले आहे.
एकाविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा
भुसावळातील नेहरू मैदानावर उदर निर्वाहासाठी बाहेरील गावातून एक कुटुंब आले असून या कुटुंबातील 12 वर्षीय मुलीस संशयीत आरोपी मंगल याने बिस्कीट देतो, असे आमिष दाखवून रेल्वे स्थानकाकडे नेले, अशी तक्रार बेपत्ता बालिकेच्या आईने बाजारपेठ पोलिसात मंगळवारी रात्री दिली आहे. शनिवार, 7 रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास या महिलेने तिच्या 12 वर्षाच्या मुलीसह अन्य दोन लहान मुलांना भीक मागण्यासाठी वाल्मीक नगरात पाठविले असता अन्य भावंडे आली मात्र 12 12 वर्षाची मुलगी न आल्याने चौकशी केल्यानंतर मंगल नावाच्या एका व्यक्तीने त्या मुलीस बिस्कीट देण्याच्या आमिषाने नेले असल्याची माहिती पुढे आली. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक गोटला तपास करीत आहे. पोलिसांनी जामनेर रोडसह बसस्थानक व रेल्वे स्थानक परीसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे बेपत्ता बालिकेसह संशयीत आरोपीचा शोध घेण्यात सुरुवात केली आहे.

