भुसावळातील व्यावसायीकांना पावली दिवाळी
वाहन बाजाराचा टॉप गियर ; कोट्यवधींची झाली उलाढाल : सुवर्ण खरेदीकडेही ग्राहकांचा अधिक कल
भुसावळ : शुक्रवारी धनत्रयोदशी व शनिवारी लक्ष्मीपूजन असल्याने भुसावळातील बाजारात विविध वस्तूंच्या खरेदीसाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली हेती. गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक संकटात असलेल्या व्यापार्यांनी दिवाळीमुळे खर्या अर्थाने ‘लक्ष्मी’ पावल्याचे चित्र दिसून आले. ग्राहकांनी दुचाकी-चारचाकी खरेदीसाठी सुवर्ण आभूषणे तसेच इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीवर अधिक भर दिला तर या माध्यमातून कोट्यवधींची उलाढाल झाली. या शिवाय कपडा मार्केट, मोबाईलसह लॅपटॉप, संगणक आदी वस्तूंनाही मोठी मागणी राहिली.
झेंडूच्या भावात चढ–उतार
धन त्रयोदशीला सकाळी दोनशे रुपये किलो झेंडूचा दर राहिला तर सायंकाळी तो थेट 120 ते 150 पर्यंत घसरला तर दुसर्या दिवशी शनिवारी शंभर रुपये किलोप्रमाणे झेंडू फुलांची विक्री होताना दिसून आली. यावल तालुक्यातील बामणोदसह फैजपूर परीसरातून विक्रेते शहरात दाखल झाले होते. नवीन वाहनांना हार घालण्यासाठी तसेच घराबाहेर शोभीवंत तोरण करण्यासाठी झेंडूच्या फुलांना शहरवासीयांची मोठी मागणी राहिली.
ऑनलाईन खरेदीकडे ग्राहकांचा वाढता कल
दिवाळीच्या सणानिमित्त ऑनलाईन खरेदी केलेली वस्तू ग्राहकांना घरपोच मिळत असल्याने ग्राहकांचा ऑनलाईन खरेदीकडे कल राहिला शिवाय आकर्षक ऑफर असल्याने इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदीच्या माध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल झालेली दिसून आली.
वाहन बाजाराचा टॉप गियर
शहरात धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर तसेच लक्ष्मी पूजनासाठी भुसावळात मोठ्या प्रमाणावर दुचाकी तसेच चारचाकी वाहनांची विक्री झाली. त्यात पाचशेवर दुचाकी तर 30 चारचाकींची विक्री झाल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. दरम्यान, भुसावळातील सराफा बाजारातही सोने-चांदीचे दागिणे, नाणे, तसेच बिस्किटांना अधिक मागणी होती तर लाइटवेट (हलक्या) ज्वेलरीला महिलावर्गाची पसंती राहिली. शहरातील आठवडे बाजारातील कपडा मार्केटसह ब्रँडेड पादत्राणे, डेअरी, स्विट मार्ट आणि किराणा दुकानांवर ग्राहकांनी विविध वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी केली होती.
इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचीही खरेदी
शहरातील विविध भागातील इलेक्ट्रॉनिक्स दुकानातही ग्राहकांची मोठी वर्दळ दिसून आली तसेच मोबाईल, लॅपटॉपलादेखील मागणी राहिली. ग्राहकांनी टीव्ही, फ्रीज, एसी, वॉशिंग मशीन खरेदी केल्याने या माध्यमातूनही लाखोंची उलाढाल झाल्याचे सांगण्यात आले.

