ठाकरे सरकारचा मोठा निर्णय : उद्यापासून राज्यात संचारबंदी
मुंबई : राज्यातील ठाकरे सरकारने मंगळवारी रात्रीपासून राज्यात संचारबंदी जारी केली आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या प्रकाराचा विषाणू (स्ट्रेन) आल्यानंतर खबरदारी म्हणून हा निर्णय जारी करण्यात आला आहे. राज्यातील कोरोना आणि कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर तातडीची बैठक बोलावल्यानंतर हा निर्णय घेतला. 25 ते 31 डिसेंबर या काळातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळण्यासाठी ही बैठक घेण्यात आली. कोरोनाचा काळ असताना ख्रिसमस आणि नववर्ष स्वागतासाठी निर्बंध घालण्यात आले आहेत. नववर्ष स्वागतासाठी हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्स संघटनेने मध्यरात्रीपर्यंत सुरू ठेवण्याची मागणी सरकारकडे केली होते मात्र रात्रीच्या संचारबंदीमुळे सारे बंद राहणार आहे.
यांची बैठकीला उपस्थिती
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, गृहराज्यमंत्री सतीश पाटील आणि शंभूराजे देसाई यांच्यासह अतिरीक्त सचिव सीताराम कुंटे, मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह, कायदा-सुव्यवस्था अतिरिक्त आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांची या बैठकीला उपस्थिती होती.


असे असतील संचारबंदीचे नियम
मंगळवारी रात्रीपासून महानगरपालिका क्षेत्रात रात्री 11 ते पहाटे सहापर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली असून ती 5 जानेवारीपर्यंत लागू राहणार आहे.