मुंबई-दिल्ली प्रवास अवघ्या 19 तासात : राजधानी एक्स्प्रेस 30 पासून धावणार
भुसावळ : रेल्वे प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी मुंबई – हजरत निजामुद्दीन राजधानी सुपरफास्ट विशेष गाडी बुधवार, 30 डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला असून अवघ्या 19 तासात प्रवासी दिल्ली गाठता येणार आहे. नाताळ आणि हिवाळ्यात पर्यटनाला जाणार्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने आणि हल्ली सुरू असलेल्या रेल्वे गाड्यांना प्रवाशांची होणारी गर्दी आणि प्रतीक्षा यादीवरील प्रवाशांची संख्या लक्षात घेता रेल्वे प्रशासनाकडून मुंबई-हजरत निजामुद्दीन राजधानी एक्स्प्रेस सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या स्थानकावर थांबा
गडाउन प्रवाशांची रेल्वे गाड्यांना होत असलेली गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वे प्रशासनाकडून मुंबई-हजरत निजामुद्दीन राजधानी सुपरफास्ट विशेष गाडी बुधवार, 30 डिसेंबरपासून दर सोमवार, बुधवार, शुक्रवार, शनिवारी मुंबईहुन दुपारी 4.10 वाजता सुटल्यानंतर दुसर्या दिवशी हजरत निजामुद्दीन स्टेशनला 11 वाजता पोहोचेल. ही गाडी नाशिकला सायंकाळी 6.43, जळगावला रात्री 9.10, भोपाळ, झाँसी, आगरा येथे थांबा देण्यात आला आहे. अप 01222 हजरत निजामुद्दीन-मुंबई राजधानी सुपरफास्ट विशेष गाडी गुरुवार, 31 डिसेंबरपासून दर मंगळवार, गुरुवार, शनिवार, रविवारी हजरत निजामुद्दीन येथून दुपारी 4.55 वाजता सुटल्यानंतर दुसर्या दिवशी मुंबई स्टेशनला सकाळी 11.50 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला जळगावला पहाटे सहा वाजता, नाशिक स्थानकावर 8.30 वाजता पोहोचणार आहे. या गाडीचे बुकींग विशेष शुल्कासह 25 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. केवळ आरक्षित तिकीट असलेल्या प्रवाशांनाच या गाडीत प्रवास करता येणार असून प्रवाशांना कोरोना नियमांचे पालन करावे लागणार आहे.

