जगाचा निरोप घेण्याची आली वेळ ! : सचिन वाझेंच्या पोस्टने उडाली खळबळ
मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटके आणि धमकीचे पत्र असलेली स्कॉर्पिओ कार सापडल्यानंतर त्याचा तपास सचिन वाझे यांच्याकडे होती मात्र या स्कॉर्पिओ कारचा ताबा असलेल्या ठाण्यातील व्यापारी मनसुख यांचा मृत्यू झाला आणि वाझे संशयाच्या भोवर्यात सापडले. विरोधी पक्षाने त्यांचे निलंबन करुन अटकेची मागणी केली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हा तपास राज्य दहशतवाद विरोधी पथकाकडे (एटीएस) सोपविला. हिरेन मृत्यू प्रकरणांत चौकशीच्या घेर्यात अडकलेले गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाचे सचिन वाझे यांची दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) ने तब्बल दहा तास चौकशी केली. यानंत शनिवारी वाझे यांनी व्हॉट्सअॅपवर धक्कादायक पोस्ट टाकल्याने राज्यात मोठी खळबळ उडाली आहे.
वाझेंनी म्हटले, आता जगाचा निरोप घेण्याची आली वेळ !
3 मार्च 2004 रोजी सीआयडीमधील काही अधिकार्यांनी मला एका खोट्या प्रकरणात अटक केली होती. मला केलेली ही अटक आजपर्यंत अयोग्य आहे. या इतिहासाची मला आता पुन्हा जाणीव करुन देत आहे. माझे सहकारी- अधिकारी मला चुकीच्या प्रकरणात अडकविण्याचा प्रयत्न करत आहेत, असा दावा सचिन वाझे यांनी व्हॉट्सअॅप स्टेटस्द्वारे केला आहे. सचिन वाझे पुढे म्हणाले की, सध्याच्या परीस्थितीत थोडा फरक आहे. 17 वर्ष माझ्याकडे अपेक्षा, सहनशीलता, आयुष्य आणि नोकरीही होती, पण आता माझ्याकडे आयुष्याची 17 वर्षेही नाहीत, ना नोकरी, ना जगण्याची अपेक्षा आहे, असं सचिन वाझे यांनी म्हटलं आहे. तसेच जगाचा निरोप घेण्याची वेळ जवळ येत आहे, असं विधानही सचिन वाझेंनी केल्यानं सर्वत्र खळबळ उडाली आहे. सचिन वाझेंच्या पोस्टनंतर वरिष्ठ अधिकारी त्यांच्या संपर्कात असून त्यांनी सचिन वाझेंना पोस्टही डिलीट करण्यास सांगितले आहे.


एकाच दिवसात दोनदा बदली
सचिन वाझे यांची आधी नागरी सुविधा केंद्रात (सिटीझन फॅसिलिटेशन सेंटर ) विभागात बदली करण्यात आली होती. यासंदर्भात पोलीस मुख्यालयातून गुरुवारी रात्री अधिकृत पत्रक निघाले होते मात्र त्यानंतर लगेच त्यांची एसबी-1 म्हणजेच विशेष शाखेत त्यांची कागदोपत्री बदली करण्यात आली आहे. दरम्यान, सचिन वाझे यांची एकाच दिवसात दोनदा बदली झाली होती.