विद्यार्थ्यांना दिलासा : पहिली ते आठवीपर्यंतचे विद्यार्थी सरसकट पास


मुंबई : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर दुसर्‍यांदा इयत्ता 1 ली ते 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्यात येणार असून शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी याबाबत घोषणा केली आहे. कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून राज्यातील शाळा जवळपास बंदच आहेत. इयत्ता पहिला ते चौथीपर्यंतचे वर्ग अद्यापही सुरू झाले नाहीत. तर, 5 ते 8 वी पर्यंतच्या शाळा मध्यंतरी सुरु करण्यात आल्या होत्या मात्र अनेक ठिकाणी हेही वर्ग सुरू भरलेच नाहीत केवळ, ऑनलाईन, ऑफलाईन, युट्यूब, गुगलच्या माध्यमातून आपण शिक्षण सुरू ठेवलं होतं, असे शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. विद्यार्थ्यांपर्यंत विविध माध्यमातून शिक्षण पोहोचावं, त्यांचा अभ्यासक्रम पूर्ण व्हावा, यासाठी आपण प्रयत्न केले. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठीही आपण निर्णय घेतले आहेत. त्यानुसार, पहिली ते 8 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या वार्षिक मुल्यमापन संदर्भात महत्वाचा निर्णय घेत असल्याचं शिक्षणमंत्र्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं. देशातील मोफत शिक्षण कायद्याच्या अंतर्गत या विद्यार्थ्यांचं वार्षिक मुल्यमापन करणे आवश्यक आहे. मात्र, कोरोनामुळे यंदा ते शक्य नाही. त्यामुळेच, पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सरसकट पास करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतल्याचे वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. तसेच, इयत्ता 9 वी आणि 11 वीच्या विद्यार्थ्यांसाठीचाही निर्णय लवकरच जाहीर करू, असेही शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं आहे.

 






मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !