वरणगावत दारूची बेकायदा वाहतूक : तिघांविरुद्ध गुन्हा
वरणगाव : वरणगाव पोलसांनी हॉटेल साई पार्कसमोर एक कारमध्ये 1 लाख 28 हजार रुपये किमतीची देशी विदेशी दारू जप्त केली असून याप्रकरणी कार मिळून एकूण 11 लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. याप्रकरणी वरणगाव पोलिसांत तिघांविरूद्ध गुन्हा दाखल झाला. वरणगावचे प्रशिक्षणार्थी डीवायएसपी नितीन गणापूरे, हवालदार मुकेश जाधव, अजय निकम, पराग दुसाणे, योगेश जोशी हे सोमवारी रात्री राष्ट्रीय महामार्गावर गस्त घालत होते. रात्री 10.30 वाजेच्या सुमारास महामार्ग हॉटेल साई पार्कसमोर (एम.एच.19. सी.झेड.5816) कंपनीची कार वरणगावकडून मुक्ताईनगरकडे जाताना दिसली. या कारचा संशय आल्याने पोलिसांनी तिला थांबवून चौकशी केली. त्यात कारमध्ये देशी व विदेशी दारूचे 24 बॉक्स आढळले. यानंतर कार चालकास मुद्देमालाच्या बिलाबाबत विचारले असता त्यांनी बिल नसल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी गाडी चालक दीपक सुकाराम चौधरी (36, रा.मुक्ताईनगर), प्रफुल्ल पद्माकर खडसे (32, रा.कोथळी), मनोज नामदेव जाधव (35, रा.रोहिदास नगर, मुक्ताईनगर) यांना मुद्देमालासह ताब्यात घेतले. पोलिस कर्मचारी योगेश जोशी यांच्या फिर्यादीवरून तिघांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.





