भुसावळातील खुनाचा आठ तासात उलगडा : तिघे आरोपी जाळ्यात
किरकोळ वाद बेतला जीवावर : पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांची माहिती
भुसावळ : भुसावळातील शहरातील लिम्पस क्लब रीक्षा स्टॉपजवळ 34 वर्षीय युवकाची दगडाने हत्या करण्यात आल्याची धक्कादायक
घटना मंगळवारी सकाळी आठ वाजता उघडकीस आल्यानंतर शहरात खळबळ उडाली होती. शहर पोलिसांनी अत्यंत बारकाईने गुन्ह्याचा तपास करीत आठ तासात गुन्ह्याची उकल करून तिघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. खुनामागे अद्याप ठोस कारण निष्पन्न झाले नसलेतरी शाब्दीक वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपींनी हा खून केल्याची प्राथमिक कबुली दिली आहे मात्र सर्वच बाजूने पोलिसांकडून तपास केला जात असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी बुधवारी सकाळी 11 वाजता शहर पोलिस ठाण्यात पत्रकार परीषदेत दिली. या घटनेत आरोपींनी संदीप एकनाथ गायकवाड (34, रा.समतानगर, ध्यान केंद्राजवळ) या इसमाचा खून केल्याचे उघड झाले होते. पत्रकार परीषदेला शहरचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे व सहा.निरीक्षक संदीप दुणगहू उपस्थित होते.
यांनी उघडकीस आणला गुन्हा
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदशर्नाखाली पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, अर्चित चांडक, शहरचे सहा.निरीक्षक संदीप दुणगहू, शहर व बाजारपेठचे हवालदार राजेश बोदडे, हवालदार संजय सोनवणे, हवालदार मो.वली सैय्यद, सोपान पाटील, जुबेर शेख, विकास सातदिवे, कृष्णा देशमुख यांनी हा खुनाचा गुन्हा उघडकीस आणला.



या आरोपींना केली अटक
संदीप एकनाथ गायकवाड (34, रा.समतानगर, ध्यान केंद्राजवळ) या इसमाच्या खून प्रकरणी अजय अशोक पाठक (19, ऑर्डनन्स फॅक्टरी परीसर, भुसावळ), पंकज संजय तायडे (19, राहुल नगर, भुसावळ) व आशिष श्रीराम जाधव (19, श्रीराम नगर, भुसावळ) या संशयीतांना अटक करण्यात आली. विशेष म्हणजे मयत व अटकेतील आरोपींची कुठलीही गुन्हेगारी नाही, केवळ किरकोळ वादातून त्यांनी हा खून केल्याची बाब पुढे आली आहे.
भुसावळातील खुनासंदर्भात पत्रकार परीषदेत माहिती देताना पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे साहेब

