बालाजी सिटीत ‘नमो गार्डन’ अंतिम टप्प्यात ; लवकरच नागरिकांसाठी खुले होणार : नगराध्यक्षा छायाताई पाटील यांची माहिती
एक कोटींच्या निधीतून उभारणी अँफिथिएटर वनौषधी बँक सौरदिवे आणि केळी उत्पादक शेतकरी दाम्पत्याचे शिल्प ठरणार आकर्षण
यावल (गुरुवार, 27 ऑगस्ट 2026) : यावल शहराच्या विस्तारित भागातील बालाजी सिटी परिसरात साकारत असलेल्या बहुप्रतिक्षित ‘नमो गार्डन’चे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. लवकरच हे भव्य आणि बहुउद्देशीय उद्यान नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहे. या विकासकामाची स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नगराध्यक्षा सौ.छायाताई पाटील यांनी नुकतीच प्रत्यक्ष पाहणी करून कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला.
एक कोटींच्या निधीतून उभारणी
महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त एक कोटी रुपयांच्या निधीतून या उद्यानाची उभारणी करण्यात येत आहे. हे उद्यान केवळ नागरिकांच्या विरंगुळ्याचे केंद्र न राहता शहराच्या सौंदर्यात भर घालणारा आणि स्थानिक संस्कृतीचे दर्शन घडविणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून विकसित करण्यात येत आहे.



सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी अँफिथिएटर
उद्यानामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम, बालनाट्य तसेच विविध सार्वजनिक उपक्रमांसाठी आकर्षक खुले नाट्यगृह अर्थात अँफिथिएटर उभारण्यात येत आहे. सुमारे 150 प्रेक्षकांची क्षमता असलेली गॅलरी या ठिकाणचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे. भविष्यात विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांसाठी या सुविधेचा उपयोग होणार आहे.
सातपुड्यातील वनौषधींची विशेष लागवड
उद्यानात पर्यावरण संवर्धनालाही विशेष महत्त्व देण्यात आले आहे. लगतच्या सातपुडा पर्वतरांगेत आढळणार्या दुर्मिळ वनौषधी, विविध फळझाडे तसेच सावली देणार्या डेरेदार वृक्षांची लागवड करण्यात येत आहे. त्यामुळे हे उद्यान नागरिकांसाठी मनोरंजनासोबतच निसर्ग आणि वनस्पतींची ओळख करून देणारे केंद्र ठरणार आहे.
सौरऊर्जा आणि ठिबक सिंचनाचा वापर
उर्जाबचतीच्या दृष्टीने उद्यानात सौरऊर्जेवर चालणारे 10 मोठे दिवे बसविण्यात येणार आहेत. तसेच उद्यानातील हिरवळ आणि लॉनची देखभाल करताना पाण्याची बचत व्हावी, यासाठी आधुनिक ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक आणि स्मार्ट पद्धतीने या उद्यानाचा विकास केला जात आहे.
केळी उत्पादक शेतकरी दाम्पत्याचे आकर्षक शिल्प
यावल तालुक्याची प्रमुख ओळख असलेल्या केळी पिकाचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी उद्यानाच्या मध्यभागी केळी उत्पादक शेतकरी दांपत्य आणि केळीच्या घडाचे आकर्षक शिल्प उभारण्यात येत आहे. स्थानिक कृषीसंस्कृतीचे प्रतीक असलेले हे शिल्प उद्यानाचे विशेष आकर्षण ठरण्याची अपेक्षा आहे.
गुणवत्तेशी तडजोड न करण्याच्या सूचना
पाहणीदरम्यान सुरू असलेल्या कामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाऊ नये, अशा कडक सूचना संबंधित कंत्राटदाराला देण्यात आल्या. नगरपालिकेचे अभियंता संग्राम खडके हे प्रत्यक्ष कामावर लक्ष ठेवून असून, उद्यानाचे काम दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक बाबींवर विशेष लक्ष दिले जात आहे.
आगामी जिल्हास्तरीय ‘सर्वोत्कृष्ट नमो गार्डन’ स्पर्धेत यावलच्या या उद्यानाला प्रथम क्रमांक मिळेल, असा ठाम विश्वास यावेळी पदाधिकार्यांनी व्यक्त केला.
या पाहणीप्रसंगी माजी नगराध्यक्ष व नगरसेवक अतुल पाटील, पराग सराफ, निसार मोमिन, हकीम शेठ, करीम मन्यार, पिंटू सेठ, समीर मेंबर, उमर कच्ची, मजहर मेंबर यांच्यासह बालाजी सिटी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

