राष्ट्रवादी सुप्रीमो शरद पवार व प्रशांत किशोर यांच्यात दिल्लीत खलबतं
नवी दिल्ली : प्रशांत किशोर यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली असताच सोमवारी दुसर्यांदा निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचले असून त्यांच्यात दिल्लीत बैठक सुरू आहे. पश्चिम बंगाल निवडणूक, देशातील राजकीय परीस्थितीबाबत या भेटीत सविस्तर चर्चा झाल्याची माहिती आहे. राज्यात महाविकास आघाडी बनवण्याचा यशस्वी प्रयोग शरद पवार यांनी केला होता. त्यामुळे 2024 लोकसभा निवडणुकीत सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊ शकतात का, त्यांची मोट कशी बांधता येईल? शरद पवार या सर्व प्रादेशिक पक्षांना एकत्र आणू शकतात का? याबाबत या दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे.
या कारणास्तव भेट महत्वाची
भाजप विरोधात निवडणुकीच्या रणनीतीमध्ये मात देणारा म्हणून प्रशांत किशोर यांचा चेहरा आहे. त्यांनी भाजप विरोधात सरकार स्थापन करण्याचा प्रयोग करणार्या शरद पवार यांची भेट घेतल्यामुळेच राजकीय वर्तुळात ही भेट चर्चेत आहे. प्रशांत किशोर यांनी याआधी नरेंद्र मोदी, पंजाब मध्ये कॅप्टन अमरिंदर सिंग, बिहार मध्ये नितीश कुमार तर 2019 विधान सभा निवडणुकीत शिवसेनेबरोबर काम केलं आहे. त्यामुळे भाजपचे राजकारण, निवडणूक जिंकण्याचे डावपेच याचा प्रशांत किशोर यांचा दांडगा अभ्यास आहे.

