राजकीय नेत्यांना वयाची 60 वर्षांची ‘निवृत्ती हवी’ ; इंदुरीकर महाराजांचे परखड वक्तव्य चर्चेत
सोलापूर(गुरुवार, 8 ऑक्टोबर 2026) : आपल्या विनोदी, मिश्कील आणि प्रबोधनात्मक शैलीतील कीर्तनासाठी प्रसिद्ध असलेले ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव येथे आयोजित कीर्तनात त्यांनी थेट राजकीय नेत्यांच्या निवृत्तीच्या वयाचा मुद्दा उपस्थित केला.
राजकारणात प्रवेशासाठी वयाची किमान अट निश्चित करण्यात आली आहे. मात्र, राजकारणातून निवृत्ती घेण्यासाठी कोणतीही निश्चित वयोमर्यादा नसल्याकडे इंदुरीकर महाराजांनी लक्ष वेधले. सरकारी नोकरीमध्ये निवृत्तीचे वय निश्चित असते, मग राजकारणातही निवृत्तीची मर्यादा असायला हवी, असा मुद्दा त्यांनी मांडला.
राजकीय पुढार्यांनी 60 वर्षांनंतर थांबायला हवे आणि राजीनामा द्यायला हवा, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले. वय वाढल्यानंतर बौद्धिक क्षमतेवर परिणाम होतो, असे सांगताना त्यांनी राजकीय नेत्यांच्या कार्यपद्धतीवरही मिश्कील भाष्य केले.
तरुणांना राजकारणात मोठ्या जबाबदार्या आणि पदांवर काम करण्याची संधी मिळण्यासाठी ज्येष्ठ नेत्यांनी योग्य वेळी बाजूला व्हावे, असा या वक्तव्याचा सूर असल्याचे दिसून येते. त्यांच्या या विधानानंतर समाजमाध्यमांवर चर्चेला उधाण आले असून, राजकीय वर्तुळातून यावर कोणत्या प्रतिक्रिया उमटतात, याकडे आता लक्ष लागले आहे.
इंदुरीकर महाराज आपल्या कीर्तनातून सामाजिक प्रश्न, तरुणाई, राजकारण आणि बदलत्या समाजव्यवस्थेवर भाष्य करण्यासाठी ओळखले जातात त्यामुळे अंजनगावातील त्यांच्या या वक्तव्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.


