माजी गृहमंत्री देशमुख पुन्हा अडचणीत : चौकशीला सामोरे अन्यथा घरी येऊन चौकशी करणार : ईडी
मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत सातत्याने वाढ होताना दिसत असून ईडीने पुन्हा देशमुखांना समन्स बजावत 24 तासात हजर व्हा अन्यथा घरी येऊन चौकशी करणार असल्याचा अल्टीमेटम दिल्याने खळबळ उडाली आहे. मंगळवारी देशमुख यांची ईडीकडून चौकशी होणार होती व त्यासाठी सकाळी 11 वाजता त्यांना कार्यालयात हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले मात्र वय, आजारपण आणि कोरोनाच्या धोक्याचं कारण पुढे करत अनिल देशमुखांनी ईडीच्या चौकशीला हजर राहण्यास नकार दिला. त्याऐवजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आपला जबाब नोंदवण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे.
चौकशीला सामोरे जाणे टाळले
ईडीने शुक्रवारी देशमुख यांच्या नागपूर व मुंबई येथील निवासस्थानी छापे टाकले होते. देशमुख यांच्याकडेही चौकशी केली होती. त्यानंतर शनिवारी पुन्हा चौकशीसाठी कार्यालयात हजर रहाण्यास बोलाविले होते. मात्र, त्यांनी चौकशी नेमकी कोणत्या विषयासंबंधी करायची आहे, हे प्रथम कळवावे, अशी मागणी वकिलांमार्फत करीत देशमुख यांनी चौकशीला जाण्याचे टाळले.




