विभागीय महिला लोकशाही दिनाचे 12 जुलै रोजी आयोजन


नाशिक : विभागीय आयुक्त कार्यालय, नाशिक रोड येथे 12 जुलै 2021 रोजी सकाळी 11 वाजता विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली महिला लोकशाही दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे, असे महिला व बाल विकास विभागाचे उपआयुक्त चंद्रशेखर पगारे यांनी एका शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे. शासकीय प्रसिध्दी पत्रकात नमुद केल्यानुसार, राज्य शासनाच्या आदेशान्वये कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर 12 जुलै, 2021 रोजी होणार्‍या विभागीय महिला लोकशाही दिनात अर्जदारांचे अर्ज समक्ष, टपाल व ईमेलव्दारे स्वीकारण्यात येणार आहेत. त्याअनुषंगाने नाशिक विभागातील नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगांव आणि नंदुरबार येथील नागरिकांनी याची नोंद घ्यावी. तसेच ज्या काही समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी तालुकास्तरावर व जिल्हास्तरावर महिला लोकशाही दिनात अर्ज केले असतील व त्यांना समस्येचे उत्तर मिळाले नसेल त्यांनी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे टोकन नंबरसह आपले अर्ज विभागीय लोकशाही दिनात सादर करावेत, असेही उपआयुक्त चंद्रशेखर पगारे यांनी कळविले आहे.

विभागीय स्तरावर महिला लोकशाही दिन
राज्य घटनेने प्रत्येक नागरिकाला समान हक्क व समान संधी असा मुलभूत हक्क दिलेला आहे. त्याअंतर्गत समस्याग्रस्त व पीडित महिलांना त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी व्यासपीठ मिळावे, त्यांच्या हक्कांचे संरक्षण होवून न्याय मिळावा तसेच महिलांच्या तक्रारी व अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून विभागीय स्तरावर महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आलेले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !