तिहेरी वाहनांच्या अपघातात तिघे तरुण जागीच ठार ; चार जखमी
पुणे : कंटेनर, पिकअप व ट्रॅक्टर अशा तिहेरी वाहनांची धडक झालेल्या अपघातात पुण्यातील तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण जखमी झाले. जखमीपैकी एकाची प्रकृती गंभीर असून, जखमींवर रतलाम येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोमवारी दुपारी 12 वाजता हा अपघात झाला. पुणे व कदमवाकवस्ती येथील तरुणा बकरी खरेदी करण्यासाठी मध्यप्रदेशात गेल्यानंतर ही घटना घडली.
अपघातात यांचा झाला मृत्यू
हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती येथील सामाजिक कार्यकर्ते नवनाथ मोहन साळुंखे (38) यांच्यासह या अपघातात उमर सय्यद, अली सय्यद (रा. पुणे. वय व पुर्ण पत्ता माहीत नाही) या तीन तरुणांचा अपघातात जागीच मृत्यु झाला तर राहुल घाडगे, आकाश साळुखे (रा. दोघेही कदमवाकवस्ती, ता. हवेली), गुलफाम अन्सारी, नजीर कुरेशी (पुर्ण नाव व पत्ता माहीत नाही) हे चार जण या अपघातात जखमी झाले. वरील चार जणांपैकी गुलफाम अन्सारी याची प्रकृती चिंताजनक आहे.