हप्ता मागणार्या तोतया महिला पत्रकारासह दोघांना अटक
पुणे : क्राईम प्रेस रीपोर्टर असल्याचे सांगून परमिटरुम चालकाकडे हप्ता मागणार्या तोतया महिला पत्रकार हाजलिना प्रमोद जयस्वाल (35, रा. ताडीवाला रोड) आणि सतपाल सिंग अमरसिंग बग्गा (वय 57, रा. वाघोली) यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदाराची सेवन लव चौक येथे इंप्रेस सेव्हन लव्हज परमिट रुम असून शनिवारी संशयीत तेथे आल्यानंतर त्यांनी क्राईम प्रेस रीपोर्टर असल्याचे सांगत अवैधरीत्या दारुची विक्री करत आहात, लोकांना आपल्या परमिटरुममध्ये बसवून दारु पिण्याची परवानगी देत असल्याचे सांगून त्यांनी एक हजार रुपये उकळून निघून गेले होते मात्र काही वेळाने त्यांनी फोन करुन जर केस करायची नसेल तर जादा पाच हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी केल्याने तक्रारदाराने पोलिसांना माहिती दिल्यानंतर सापळा रचला. शनिवारी दुपारी दीड वाजता ते पैसे घेण्यासाठी आले असताना पोलिसांनी दोघांना पकडले.