यावल पालिकेच्या लाचखोर मुख्याधिकार्‍यांची पोलीस कोठडीत रवानगी


कंत्राटदाराकडून 28 हजारांची लाच घेताना एसीबीने केली होती अटक : अनेक रडारवर

यावल : जळगावच्या कंत्राटदाराकडून रस्ता कामाची वर्क आऊट ऑर्डर काढून देण्याच्या मोबदल्यात 28 हजारांची लाच घेताना पालिकेचे मुख्याधिकारी बबन गंभीर तडवी (रा.मातृस्नेहा हाऊसिंग सोसायटी, ई-विंग, शहाड रेल्वे स्टेशनच्यामागे, कल्याण, ह.मु.रा.राजोरी, ता.पाचोरा, जि.जळगाव) यांना जळगाव एसीबीच्या पथकाने शुक्रवारी दुपारी अटक केली होती. संशयीत तडवी यांना शनिवारी भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची (सोमवारपर्यंत) पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

पालिका कार्यालयातच स्वीकारली लाच
जळगावच्या 42 वर्षीय तक्रारदाराला यावलच्या वाणी गल्लीतील रस्त्याच्या कामाची वर्क आऊट ऑर्डर काढुन देण्याच्या मोबदल्यात आरोपी मुख्याधिकारी बबन तडवी यांनी 29 व 30 जुलै रोजी 28 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. या संदर्भात एसीबीकडे तक्रार केल्यानंतर सापळा रचण्यात आला. शुक्रवारी दुपारी तडवी यांनी स्वतःच तक्रारदाराकडून लाच स्वीकारल्यानंतर एसीबीच्या पथकाने त्यांना रंगेहाथ अटक केल्याने पालिकेच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली. दरम्यान, संशयीत आरोपी तडवी यांना शनिवारी भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सोमवारी त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. तपास जळगाव एसीबीचे नूतन पोलीस उपअधीक्षक शशीकांत एस.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजोग बच्छाव व सहकारी करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !