25 कोटींच्या पेटीचे आमिष दाखवत सेवानिवृत्त अधिकार्याला 56 लाखांचा गंडा
अकोला : एका सेवानिवृत्त अधिकार्याला तब्बल 56 लाख रुपयांना गंडविल्याप्रकरणी पोलिसांनी 11 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून एक नायजेरियन तरुण आणि बंगलोर येथून एक अशा दोन आरोपींना अटक केली.
25 कोटींचे आमिष महागात
लहरीयानगर येथील आत्माराम रामभाऊ शिंदे यांनी फेसबुकवर अनेकांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. त्यानंतर ठकबाजांनी त्यांच्याशी संभाषण सुरू केले. त्यापैकी एकाने सांगितले की, तो अमेरिकेतील सैन्यात कार्यरत असून सध्या इस्रायल येथे आहे. 25 कोटी रुपयांची एक पेटी इस्रायल येथील सैनिकाकडे असल्याचे सांगत ही पेटी तो अमेरिकेत घेऊन जाऊ शकत नाही, अशी बतावणी केली. ही पेटी भारतात पाठवून शिंदे यांना देण्याचे आमिष दिले. त्या मोबदल्यात विविध टॅक्स भरावे लागणार असल्याचे सांगितले. या आमिषाला बळी पडत शिंदे यांनी 56 लाख रुपये विविध राज्यांतील बँक खात्यात पाठविले. ही रक्कम ठकबाजांनी काढून घेतली. फसवणूक झाल्याचे शिंदे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तक्रार दिली. या प्रकरणात नायजेरिया येथील रहिवासी हरिसन इंगोला, रा. डेल्टा सिटी, नायजेरिया यास मुंबईतून अटक करण्यात आली तर दुसरा आरोपी बंगलोर येथील रहिवासी नसिमुद्दीन यालाही बेड्या ठोकल्या.
विदेश व परराज्यातील 10 आरोपी
आरोपींमध्ये रॅपगस्ट सुजी, रिधी गुप्ता (रा. आनंदपूर, कोलकाता, पश्चिम बंगाल), आशिष कुमार (कॅनरा बँक, नवी दिल्ली), नसिमुद्दीन (रा. राजाजीनगर, बंगलोर), सिबानू कायपेंग (रा. पेरांबूर, केरळ), इम्रान हुसेन (रा. बंगलोर), सोबीनोय चकमा (रा. जमनानगर, गुजरात), रमलज्योती चकमा (रा. एमजी रोड, बंगलोर), अशोक (रा. दिल्ली), अँथनी (रा. सिरिया) या 10 ठकबाजांचा समावेश आहे.
35 लाख वाचले
शिंदे यांना अंतिम टप्प्यात 35 लाखाची मागणी करण्यात आली. दरम्यान, शिंदे यांचे मुंबईला गेलेले कुटुंबीय परतल्यानंतर त्यांनी आणखी 35 लाख रुपये टाकताच 25 कोटी रुपयांची पेटी मिळणार असल्याचे सांगितले.
मात्र कुटुंबीयांनी त्यांना समजावताच फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले आणि 35 लाख वाचले.