बिग ब्रेकींग : बीएचआर घोटाळ्यातील प्रमुख संशयीत सुनील झंवरला नाशिकमधून अटक
जळगाव : राज्यभर गाजलेल्या बीएचआर पतसंस्था घोटाळ्यातील प्रमुख संशयीत आरोपी सुनील झंवर याला पुणे आर्थिक गुन्हे शाखेने नाशिकमधून अटक केली आहे. आरोपीच्या अटकेने आता अनेक बाबींचा खुलासा होणार आहे. बीएचआर सहकारी संस्थेत आर्थिक गैरव्यवहार केल्या प्रकरणी 27 नोव्हेंबर 2020 रोजी पुणे येथे दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात तत्कालीन अवसायक जितेंद्र कंडारे याच्यासह व्यावसायीक सुनील झंवर याचाही समावेश होता. तेव्हापासून झंवर हा पसार होता. त्याचे जामीन अर्ज अनेकदा नाकारण्यात आले होते. मध्यंतरी त्याला अटकेपासून 15 दिवस दिलासा मिळाला होता. यानंतर मात्र त्यांच्या जामीनावर सुनावणी सुरू असल्याची माहिती समोर आली होती. यातच मंगळवारी पहाटे पोलिसांनी नाशिक येथून झंवरला अटक केली आहे. बीएचआर गैरव्यवहार प्रकरणात सुनील झंवरचे पुत्र सूरज झंवर यांना आधीच जामीन मिळाला आहे. तर विवेक ठाकरे आणि सुजीत वाणी यांनाही जामीन मिळालेला आहे. बीएचआर गैरव्यवहाराच्या दुसर्या टप्प्यात तत्कालीन अवसायक जितेंद्र कंडारे आणि सुनील झंवर हे प्रमुख संशयीत आरोपी आहेत. अनेक महिन्यांपर्यंत त्यांनी पोलिसांना गुंगारा दिला होता. यानंतर गेल्या महिन्यात जितेंद्र कंडारे यांना अटक करण्यात आल्यानंतर सुनील झंवर यांच्या अटकेची प्रतीक्षा होती. आता पुण्याच्या आर्थिक गुन्हा शाखेने त्याच्या मुसक्या आवळल्याने या प्रकरणातील चौकशीला गती येणार आहे.