भुसावळात आज भोरगाव लेवा पंचायतीचे कुटुंबनायक मांडणार समाजाची भूमिका


माजी मंत्री एकनाथराव खडसेंचे पहिल्या यादीत नाव नाही : विधानसभा निवडणुकीतील समाजाचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता

भुसावळ : सलग सहा टर्मपासून आमदार राहिलेल्या एकनाथराव खडसे यांना भाजपाने जाहीर केलेल्या 125 उमेदवारांच्या यादीत स्थान न दिल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. या पार्श्‍वभूमीवर भोरगाव लेवा पंचायतीचे कुटुंबनायक रमेश विठू पाटील हे बुधवारी दुपारी 12 वाजता सोनिच्छावाडीत पत्रकार परीषद घेवून आपली स्पष्ट भूमिका मांडणार आहे. खडसेंना दुसर्‍या यादीत स्थान न मिळाल्यास लेवा समाजाची निवडणुकीतील भूमिका काय असेल? याबाबत पाटील हे मोठी घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, कुटुंबनायक नेमकी काय भूमिका पत्रकार परीषदेत मांडतात याकडे समाजबांधवांसह सर्वांची उत्सुकता वाढली आहे.

दुसर्‍या यादीबाबत कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता
शिवसेना-भाजपा महायुतीत भाजपाच्या वाट्याला तब्बल 164 जागा आल्या असून मित्र पत्र शिवसेनेला 124 जागा देण्यात आल्याचे समजते. भाजपा हा युतीतील मोठा भाऊ ठरल्यानंतर भाजपाने मंगळवारी 125 उमेदवारांची यादी जाहीर केली मात्र त्यात पक्षाचे ज्येष्ठ नेते खडसेंचे नाव नसल्याने समर्थकांसह कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. आता अन्याय बस्स! या मानसिकतेत कार्यकर्ते आले असून खडसेंनीदेखील कान भरणारे कोण? हे आपल्याला ठावूक असल्याचे सांगत मला साथ देणार ना ! असा कलही जाणून घेतला मात्र पुढील भूमिकेबाबत कुठलाही निर्णय जाहीर केलेला नाही. उमेदवारी अर्ज भरला आहे, आता दुसर्‍या यादीची आपल्याला प्रतीक्षा आहे, असे सूचक विधान त्यांनी करीत अधिक बोलणे टाळले. बुधवारी दुपारी 12 ते 1 वाजेच्या सुमारास भाजपाची दुसरी यादी जाहीर होणार असून त्यात खडसेंसह चंद्रशेखर बावनकुळे तसेच विनोद तावडे यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे दुसर्‍या यादीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.















मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !