यावलमध्ये गौण खजिनाची अवैध वाहतूक : दोघांविरोधात गुन्हा
यावल : शहरातील बोरावल रस्त्यावर असलेल्या खंडेराव मंदिरासमोरून विनापरवाना गौण खनिजाची वाहतूक करणार्या दोन ट्रॅक्टर चालकांवर मंगळवार, 12 ऑक्टोबर रोजी पहाटे सहा वाजता कारवाई करत यावल पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. पोलीस कर्मचारी राहुल चौधरी हे मंगळवारी 12 ऑक्टोबर रोजी पहाटे सहा वाजेच्या सुमारास शहरातील बोरावल रस्त्यावर असलेल्या खंडेराव मंदिराजवळ गस्तीवर असतांना ट्रॅक्टर क्रमांक (एम.एच.40 एल.1100) आणि (एम.एच.19 ए.पी.9386) या दोन ट्रॅक्टरमधून विनापरवाना गौण खनिजाची चोरटी वाहतूक होताना दिसले. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल राहुल चौधरी यांनी कागदपत्रांची मागणी केली असता ट्रॅक्टर चालक रघुनाथ पांडुरंग भील (40) आणि दगडू अंबादास भील (30, दोघे रा.बोरावल, बोरावल गेट, यावल) यांच्याकडे गौण खनिज वाहतूक करण्याची कोणतीही परवानगी नसल्याचे आढळून आले. दोन्ही ट्रॅक्टरवर कारवाई करत पोलीस ठाण्याच्या आवारात ट्रॅक्टर जप्त करण्यात आले. पोलीस कॉन्स्टेबल राहुल चौधरी यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात दोन्ही ट्रॅक्टर चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहा.फौजदार नेताजी वंजारी करीत आहेत.
