ट्रॅक्टरवरून पडल्याने नेरीच्या इसमाचा मृत्यू
पाचोरा : ट्रॅक्टरखाली दबले जावून नेरीच्या 50 वर्षीय इसमाचा मृत्यू झाला. ही घटना तालुक्यातील लोहारी बुद्रुक गावाजवळ रविवार, 17 रोजी सायंकाळी घडली. याप्रकरणी पिंपळगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. लुकमान उस्मान पठाण (50, रा.नेरी, ता.पाचोरा) असे मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
तोल जावून पडल्याने जागेवरच मृत्यू
लुकमान पठाण हे आपल्या कुटुंबासोबत गेल्या 5 वर्षांपासून मध्यप्रदेशात ऊसतोडीसाठी जात असत. त्यांच्याकडे साखर कारखान्याचे दोन ट्रॅक्टर आहे. रविवार, 17 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5.30 वाजेच्या दरम्यान नेरी येथुन पहुरमार्गे मध्यप्रदेशात जाण्यासाठी निघाले होते. त्यांचा मोठा मुलगा बबलु लुकमान पठाण हा ट्रॅक्टर चालवित असतांना लोहारी गावाजवळ ट्रॅक्टरमधील साहित्यावर बसलेले असतांना लुकमान पठाण याचा तोल जावुन ट्रॅक्टरचे मोठे टायर त्यांचे डोक्यावरुन गेल्याने ते जागेवरच ठार झाले. मयताचे शवविच्छेदन डॉ. अमित साळुंखे यांनी केल्यानंतर सदरच्या गुन्ह्याची नोंद पाचोरा पोलिसात होवून शुन्य क्रमांकाने पिंपळगाव हरे. पोलिस स्टेशनकडे वर्ग करण्यात आला. मयताच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी, तीन मुले व दोन मुली असा परीवार आहे. मयतावर नेरी येथे सोमवार, 18 रोजी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. तपास सहा.पोलीस निरीक्षक कृष्णा भोये यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजय माळी करीत आहेत.

