लाखोंच्या कपड्यांसह इलेक्ट्रॉनिक वस्तू असलेला ट्रक चोरट्यांनी लांबवला


जळगाव : शहरातील अजिंठा चौफुली परीसरात रस्त्याच्या कडेला उभा केलेला ट्रक शनिवार, 16 ऑक्टोबर रोजी पहाटे सहा वाजेच्या सुमारास चोरट्यांनी लांबवला. या ट्रकमध्ये आठ लाख रुपयांचे कपडे, प्लायवूड, ऑटो पार्टस, कॉम्प्युटर पार्टस, इलेक्ट्रॉनिक वस्तू होत्या. ट्रक चोरीमुळे शहरात खळबळ उडाली. एमआयडीसी पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

लाखोंचे साहित्य घेवून चोरटा पसार
जळगावातील जमुनानगर येथील दीपक पंडित हळदे यांच्या मालकीचा हा ट्रक (क्रमांक एम.एच.15 एजी 6399) हा साहित घेवून रविवार, 17 रोजी रावेर, सावदा येथे रवाना होणार होता. शनिवारी सायंकाळी ट्रक चालक सर्फराज उर्फ गुड्डू अहमद तडवी याने बळीराम पेठेतून रेडिमेड कपडे, प्लायवूड, ऑटो पार्ट्स, कॉम्प्युटर पार्ट्स, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, खुर्ची, तेलाचे कार्टून, पाईप, हार्डवेअरचे सामान असा आठ लाख रुपयांचा माल ट्रकमध्ये भरला. चालकाने रात्री 11.30 वाजता त्याने हा ट्रक अजिंठा चौफुली परीसरात रस्त्याच्या कडेला उभा करीत ताडपत्रीने झाकला. रविवारी सकाळी सात वाजता ट्रक चालक सर्फराज तडवी अजिंठा चौफुली परीसरात आला असता त्याला ट्रक दिसून आला नाही. त्याने याबाबत तात्काळ हळदे यांच्या भावाला कळविले. दोघांनी लागलीच जळगाव, धुळे येथे जाऊन भंगार बाजारात ट्रक शोधला असता ट्रक मिळाला नाही. ट्रक उभा केलेल्या जागी एक सुरक्षारक्षक रात्री ड्यूटीवर होता. त्याला विचारणा केली असता सकाळी सहा वाजता एक तरुण हा ट्रक सुरू करून घेऊन गेल्याचे त्याने सांगितले. याप्रकरणी हळदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आठ लाख रुपयांचा माल व एक लाख रुपयांचा ट्रक असा नऊ लाखांचा ऐवज चोरीस गेल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !