भुसावळात वाहतुकीला अडथळा निर्माण करीत साहित्य ठेवणार्या व्यापार्यांवर कारवाई
पोलिसांच्या कारवाईने खळबळ : वर्दळीच्या रस्त्यावर वाहने लावणार्या वाहनधारकांवरही कारवाई
भुसावळ : दिवाळीच्या काळात बाजारपेठेत गर्दी असतांनाही व्यावसायीक वाहतूकीला अडचण निर्माण होइॅल, असे दुकानाचे साहित्य दुकानाच्या बाहेर ठेवल्याने डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक दिलीप भागवत आणि त्यांच्या सहकार्यांनी गुरूवारी रात्री आणि शुक्रवारी सायंकाळी रस्त्यावर अतिक्रमण करून बसलेल्यांवर कारवाई केली. यावेळी पालिकेचे पथकही पोलिसांसोबत होते. या संयुक्त कारवाईमुळे विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
साहित्य बाहेर ठेवल्याने रहदारीला अडथळा
दिवाळीच्या पार्श्वभुमीवर बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. त्यातच बहूसंख्य व्यावसायीकांनी त्याच्या दुकानातील साहित्य हे वाहतूकीच्या रस्त्यावर दुकानाच्या बाहेर ठेवले आहे, यामुळे वाहतूकीला अडचणी येत होत्या. सायंकाळी पोलिस निरीक्षक दिलीप भागवत व पोलिस कर्मचार्यांनी बाजारपेठेत गस्त केली. त्यावेळी वाहतूकीला अडचण ठरत असलेल्या दुकानदारांना त्याचे साहित्य दुकानात ठेवण्याच्या सूचना केल्यात. तर गुरूवारी सूचना दिलेल्या असतांनाही शुक्रवारी पुन्हा साहित्य बाहेर ठेवल्याने पोलिसांनी संबंधित व्यावसायीकांविरूध्द दंडात्मक कारवाई केली. यावेळी शहर वाहतूक शाखेचे पोलिस कर्मचारी सुध्दा मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईमुळे व्यावसायीकांमध्ये खळबळ उडाली आहे. पालिका आणि पोलिसांकडून दररोज बाजारपेठेत गस्त केली जाणार आहे. त्यामुळे वाहतूकीला अडचण होईल असे कोणीही साहित्य रस्त्यात ठेऊ नये असे आवाहन डीवायएसपी वाघचौरे यांनी केले आहे. शहर पोलिस ठाण्याच्या हद्दित निरीक्षक प्रताप इंगळे व त्यांचे सहकारी गस्त करीत आहे.



रस्त्यावरील मोटर सायकलवर कारवाई
नृसिह मंदीरापासून ते जवाहर डेअरी, अप्सरा चौक, सराफ बाजार या मार्गावर रस्त्यावर लावण्यात आलेल्या गाड्यावर पोलिसांनी कारवाई केली. तसेच रस्त्यावर लावण्यात आलेल्या मोटर सायकल चालकांना सुध्दा दंडाची पावती दिली. यावेळी रस्त्यावर वाहतूकीला अडचण ठरत असलेले बोर्ड व साहित्य सुध्दा पालिका व पोलिसांनी जप्त करून ट्रॅक्टरमध्ये भरले. यामुळे व्यावसायीकांची धावपळ झाली.
दररोज नित्याने होणार कारवाई
दिवाळीच्या पार्श्वभुमीवर बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर गर्दी राहत आहे त्यामुळे रस्ते मोकळे पाहिजे मात्र तसे होत नाही त्यामुळे पालिका प्रशासन व पोलिस प्रशासनाकडून शहरात दररोज कारवाई केली जाणार आहे. व्यावसायीकांनी विनाकारण नुकसान करून घेऊ नये, वाहतुकीच्या मार्गावर थांबू नये, असे आवाहन पोलीस व पालिकेने केले आहे.
