दिवाळी सुटीच्या ऐनवेळी नवे पत्रक : वरीष्ठ अधिकारीच नियम विसरले !
भुसावळातील शिक्षणतज्ज्ञ प्र. ह. दलाल यांचा आरोप
भुसावळ : सध्या राज्यातील शिक्षण क्षेत्रात शासन विविध गोंधळ घालत असून त्यामुळे शिक्षक, पालक व विद्यार्थी त्रस्त झाले आहेत. अगदी थोड्याच दिवसांपूर्वी राज्यातील शाळांना दिवाळीची सुटी 1 नोव्हेंबर ते 20 नोव्हेबरपर्यत जाहीर करण्यात आली. शाळांनी त्यानुसार प्रथम सत्र परीक्षेचे नियोजन केले. परीक्षा सुरूही झाली मात्र अचानक शिक्षण सहसचिव यांनी सुटीचे पत्रक रद्द करून नवे पत्र जारी केले व त्यानुसार 28 ऑक्टोंबर ते 10 नोव्हेंबरपर्यंत सुटी राहील असा आदेश दिला मात्र यामुळे सुरू असलेली परीक्षा मध्येच थांबून उर्वरीत पेपर सुटी नंतर घ्यावे लागणार आहेत.
शिक्षण विभागालाच नियोजनाचा विसर
शाळांचे सर्व नियोजन तर बिघडेलच पण सुटीत गावी जाण्याचे- येण्याचे पालकांनी केलेले नियोजनही बाधीत होणार आहे. विद्यार्थ्यांना नियोजनाचे धडे देणार्या शिक्षण खात्यालाच नियोजन शिकविण्याची वेळ आली आहे. शिवाय वरीरष्ठ अधिकारीच नियम विसरले की माहित असूनही नियमांचे पालन करायचेच नाही, असे त्यांनी ठरविले हा प्रश्न आहे. शाळा संहिता नियम क्र 51.1 नुसार जिल्ह्यातील सर्व शाळा एकाच वेळी सुरू होण्याच्या दृष्टीने जिल्ह्याच्या संबंधित समुचीत प्राधिकारी सुटीचा दिनांक निश्चित करतील व शालेय वर्ष सुरू होण्यापूर्वी तसे आदेश काढतील अशी नियमातील तरतूद आहे. मग सहसचिव पत्रक काढतातच कसे? ह्या दृष्टीने हे परीपत्रक नियम बाह्य आहे. अधिकार्यांनी शिक्षण कायदा, शाळा संहिताख नवे शिक्षण धोरण इत्यादींचा सखोल अभ्यास केल्यास अशी नामुष्की पत्करावी लागणार नाही, असे पत्रक भाजपा शिक्षक आघाडीचे राज्य कार्यकारीणी सदस्य तथा नाशिक विभाग सहसचिव प्र.ह.दलाल यांनी प्रसिद्धीस दिले आहे.



