पाचोर्‍यातील तरुणीला भेटवस्तू पाठवण्याच्या माध्यमातून अडीच लाखांचा ऑनलाईन गंडा


जळगाव : पाचोर्‍यातील एका सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणीची अमेरीकेत असल्याचा बहाणा करणार्‍या तरुणाने दोन लाख 55 हजार 500 रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली. या प्रकरणी निवांत चित्रे अशा नावाने संपर्क करणार्‍या व्यक्तीविरुद्ध फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ऑनलाईन घातला गंडा
पाचोर्‍याची रहिवासी ही तरुणी पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करते. मराठी मेट्रेमनी साइटवर ती वर संशोधन करत होती. त्यासाठी साईटवर तिने आपला प्रोफाइल फोन क्रमांकासह अपलोड केला होता. त्या क्रमांकावरून गुरुवार, 4 नोव्हेंबरला निवांत चित्रे असे नाव सांगणार्‍या तरुणाने तिच्याशी संपर्क केला आणि लग्नाची बोलणीही केली.

कस्टम व जीएसटी शुल्क भरण्याच्या नावाखाली घातला गंडा
आपण अमेरिकेतील ग्लासगो येथे राहत असल्याची बतावणी त्याने केली. प्राथमिक बोलणी झाल्यानंतर दोघांचा फोनद्वारे संपर्क वाढला होता. लग्नाचा निर्णय झाल्यानंतर त्या तरुणाने तिला भेटवस्तू पाठवत असल्याचे सांगितले. त्यात सोन्याच्या बांगड्या, सोन्याचा हार, डायमंडचे घड्याळ व एक हजार पाऊंड युके चलन ज्याची भारतीय किमंत एक कोटी रुपये आहे, अशा वस्तू पाठवलेल्या आहेत. दिल्ली विमानतळावर कस्टम व जीएसटी शुल्क भरल्याशिवाय ते पार्सल मिळणार नाही, असं सांगून संशयिताने 4 नोव्हेंबरपासून ते 23 नोव्हेंबरपर्यंत 2 लाख 55 हजार 500 रुपये ऑनलाईन घेतले. या काळात ना पार्सल आले ना संबंधिताशी संपर्क झाला. पैसे परत मिळण्याचीही शक्यता नाही. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर तरुणीने सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या तक्रारीवरुन फसवणूक व माहिती तंत्रज्ञान कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक लिलाधर कानडे अधिक तपास करत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !