फरकांडे गावातील कापूस व्यापार्याची हत्या : पोलिसांनी ताब्यात घेतले फुटेज
धरणगाव : फरकांडे येथील कापूस व्यापार्याची हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी रात्री आठ वाजता पाळधी पेट्रोल पंपाजवळ घडली होती. स्वप्नील रत्नाकर शिंपी (27, रा.फरकांडे ता. एरंडोल) यांचा मृत्यू झाला तर त्यांच्याकडील कर्मचारी दिलीप राजेंद्र चौधरी जखमी झाला होता. पोलिसांनी या घटनेनंतर तपासाला वेग दिला असून व्यापार्याने जेथून कापसाची रक्कम स्वीकारली परीसरासह इतर ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. गुन्ह्याच्या अनुषंगाने तसेच अन्य चौफेर बाजूने पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे.
पाळत ठेवून लुटारूंनी केला घात
कासोदा येथे स्वप्नील शिंपी यांचे धनदाई ट्रेडर्स हे दुकान असून शुक्रवारी दुपारी शिंपीसह त्यांच्याकडे करणारा दिलीप राजेंद्र चौधरी असे दोघे जण चारचाकीने (क्रमांक एम.एच. 01 एएल 7127) ने जळगावात रक्कम घेण्यासाठी आले होते. जळगावातील काम आटोपून ते सायंकाळच्या सुमारास फरकांड्याकडे निघाल असतानाच पाळधीनजीक दोन ते तीन दुचाकीवर आलेल्या पाच जणांनी त्यांच्या कारला मोटारसायकल आडवी लावली आणि आम्हाला कट का मारला म्हणून वाद घालण्यास सुरुवात केली. त्याचवेळी एकाने कारचा दरवाजा उघडून पैशांची बॅग लांबविण्याचा प्रयत्न केला. त्यास स्वप्नील याने विरोध केला. त्यावरुन पुन्हा वाद सुरु झाला. त्याचवेळी एकाने स्वप्नील याच्या मांडीवर व पाठीवर चाकूने वार केला. या झटापटीत किरकोळ मार लागल्याने दिलीप चौधरी हे बाजूला झाले तर जखमी अवस्थेत पैशाची बॅग घेऊन स्वप्नील हे खाली उतरले. आजूबाजूला लोक व वाहनेही थांबत असल्याचे पाहून हल्लेखोरांनी तिथून पळ काढला. जमलेल्या लोकांनी जखमी स्वप्नील यास रुग्णवाहिकेतून खाजगी रुग्णालयात आणले. तिथून त्याला जिल्हा रुग्णालय येथे आणण्यात आले. तिथे डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.





पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात
खून झाल्याची घटना समोर आल्यानंतर पोलिसांनी तत्काळ तपासचक्र फिरवायला सुरुवात केली आहे. त्यानुसार पोलिसांनी पाळधीसह जळगाव येथील अनेक सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतली आहेत. अगदी कापूस व्यवहाराची रक्कम स्वीकारली त्रूा परीसरातील देखील सीसीटीव्ही फुटेज घेतले ताब्यात आहेत. तत्पूर्वी शनिवारी धरणगाव पोलिसांनी घटनास्थळ जात पंचानामा केला तसेच घटनेचे प्रत्यक्षदर्शी दिलीप राजू चौधरी यांच्याकडून सर्व घटना समजून घेतली.
लुटपाटसह वैयक्तिक कारणांच्या अॅगलनेही पोलिसांचा तपास सुरु
चार हल्लेखोरांनी हल्ला केला. एकाला चाकूने भोसकले. परंतू रक्कम सुरक्षित राहिली. त्यामुळे या हल्ल्यामागे फक्त लुटपाटचा मुख्य उद्देश होता की, अन्य काही कारणे होती?, या दृष्टीने देखील पोलिसांनी तपास सुरू केला आहे. हल्लेखोरांचा स्वप्नील शिंपी यांच्यासोबत व्यावसायिक, वैयक्तिक काही दुष्मनी होती का?, या दिशेने देखील पोलीस तपास करत आहेत. जळगाव गुन्हे शाखेसह पाळधी पोलिसांची काही पथके शुक्रवारी रात्रीपासूनच पाळधी, धरणगाव, फरकांडे, जळगाव अशा विविध भागात हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.
