सासू-सासर्यांचा छळ असह्य : शिरसोलीत 32 वर्षीय तरुणाची आत्महत्या
आत्महत्येपूर्वी व्हाटसअॅपवर ठेवला ‘आय मिस यु बेटा’ चा स्टेटस व आढळली सुसाईड नोटही
जळगाव : सासू-सासरे यांच्या छळाला कंटाळून तालुक्यातील शिरसोली येथील 32 वर्षीय तरुणाने राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना रविवार, 28 नोव्हेंबर रोजी पहाटे साडेसाहा वाजता उघडकीस आला. तरुणाने आत्महत्येपूर्वी सुसाईड नोटही लिहिली असून त्यात सासु-सासर्यांच्या छळामुळे व त्यांच्याकडून मिळणार्या धमक्यांमुळे आत्महत्या करीत असल्याचे नमूद आहे. अमोल प्रकाश धनगर (32, रा.अशोकनगर, शिरसोली प्र.न.) असे मयत तरुणाचे नाव आहे.
राहत्या घरातच केली आत्महत्या
मयत अमोल धनगर यांचा व्यवसाय हा बकरी चारण्याचा होता व त्यातून ते कुटुंबाचे उदरनिर्वाह करीत होते. शिरसोली जळके रोडवरील भोलेनाथ नगरमधील बकर्यांच्या शेडमध्ये दररोज रात्री अमोल झोपण्यासाठी जात असत. शनिवारी रात्री त्यांनी वडिल प्रकाश धनगर यांना झोपण्यासाठी पाठवले होते व ते स्वतः घरीच झोपले. रविवारी सकाळी 6:30 वाजता वडील प्रकाश धनगर घरी आले असता त्यांना मुलगा अमोलने आत्महत्या केली असल्याचे निदर्शनास आले. यावेळी यांनी आरडाओरडा करताच गल्लीतील लोक धावले. पोलीस पाटील श्रीकृष्ण बारी यांनी त्यांचा मृतदेह खाली उतरवून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केला. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ.रेणुका भंगाळे यांनी तपासून मृत घोषित केले.

मृत्यूपूर्वी लिहिली सुसाईड नोट
अमोल यांच्या खिशात सुसाईड नोट आढळली आहे. यात त्यांनी सासु सासरे यांच्या धमक्या व छळाला कंटाळून जीवनयात्रा संपवत असल्याचे नमुद केले आहे. मयत अमोल यां पश्चात पश्चात दोन वर्षाचा मुलगा वेदांत, चार वर्षीय मुलगी तेजश्री, पत्नी, वडील, भाऊ असा परीवार आहे. अमोल यांच्या पत्नी एक ते दीड महिन्यापासून मुलांना घेऊन माहेरी गेल्याचे समजते.
सासु-सासर्यांवर व्हावी कारवाई
मृत्यूपूर्वी अमोल यांनी सुसाईड नोट लिहिली असून त्यात आज मी माझी जीवनयात्रा संपवत आहे कारण माझी सासूबाई आणि सासरा (रा.रत्नपिंप्री) सी मला फार त्रास देतात आणि फोनवर धमकी देत असल्याने मी माझी जीवनयात्रा संपवत आहे. त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही अमोल यांनी सुसाईड नोटद्वारे केली आहे. माझा बकरीचा व्यवसाय असून त्या बकर्या विकून जे पैसे येतील ते पैसे माझ्या मुलाच्या आणि मुलीच्या नावावर टाकावे, जेणेकरून त्यांना पुढे काही अडचण येणार नाही, ही माझी शेवटची इच्छा असल्याचेही सुसाईड नोटमध्ये नमुद आहे.
