मैत्रेय गुंतवणूकदारांना मोठा दिलासा : गृह राज्यमंत्री म्हणाले, नियमानुसार परतावा द्यावा

कंपनीच्या मालमत्ता न्यायालयाच्या निर्णयानंतर तातडीने लिलावात काढण्याचे निर्देश


मुंबई : गेल्या काही वर्षांपासून राज्यभरातील लाखो मैत्रेय गुंतवणूकदारांना ठेवी परत कधी मिळणार? हा प्रश्न पडला आहे. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी या संदर्भात नुकतीच गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभुराज देसाई यांनी बैठक घेतली. या बैठकीत मैत्रेय कंपनी आणि पॅनकार्ड क्लब लिमिटेड कंपनीच्या गुंतवणूकदारांना नियमानुसार परतावा देण्यासाठी कंपनीच्या मालमत्ता न्यायालयाच्या निर्णयानंतर तातडीने लिलावात काढण्यात याव्यात, असे निर्देश गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभुराज देसाई यांनी दिल्याने मैत्रेय गुंतवणूकदारांना काही अंशी दिलासा मिळाला आहे.

मंत्रालयात बैठकीचे आयोजन
या संदर्भात राज्यमंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच मंत्रालयात बैठक झाली. मैत्रेय ग्रुप ऑफ कंपनीविरुद्ध एकूण 32 जिल्ह्यांत गुन्हे दाखल आहेत. राज्यमंत्री देसाई यांनी फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने यावेळी निर्देश दिले. देसाई म्हणाले, मैत्रेय कंपनीने राज्यातील लाखो गुंतवणूकदारांना फसवले असून संबंधित गुन्हेगारांपैकी एक फरार व एक तुरुंगात आहे. हे प्रकरण निकालात काढून मालमत्तेचा लिलाव करण्यासाठीची परवानगी मिळावी यासाठी संबंधित विभागाने न्यायालयास विनंती करावी. न्यायालयाच्या निकालानंतर तातडीने मालमत्ता लिलावात काढण्याच्या प्रक्रियेसंदर्भात सक्षम प्राधिकार्‍यांनी प्रस्ताव पाठवावा. आर्थिक गुन्हे शाखेने पुढील प्रक्रिया करून मालमत्ता लिलावात काढावी आणि संबंधित गुंतवणूकदारांना दिलासा द्यावा, असे निर्देशही देसाई यांनी या वेळी झालेल्या बैठकीत दिले.

पॅन इंडियाच्या 51 लाख गुंतवणूकदारांची फसवणूक
सिंधुदुर्ग, अमरावती, सातारा, नाशिक, नवी मुंबई, नागपूर येथे या कंपनीविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून 51 लाख गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे. या गुंतवणूकदारांना दिलासा देण्यासाठी न्यायालयाच्या निर्णयानंतर तातडीने मालमत्ता लिलावाची प्रक्रिया करण्यात यावी. संबंधित सक्षम अधिकार्‍यांनी त्यासंदर्भातील प्रस्ताव पाठवावा, असे निर्देशही देसाई यांनी दिले. या बैठकीस आमदार प्रकाश आबीटकर, पाचोर्‍याचे आमदार किशोर पाटील, गृह विभागाचे उपसचिव रमेश मनाळे आदींसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !