एस.टी.बसवर दगडफेक : एस.टी.कर्मचारीच निघाला आरोपी
जळगाव : जामनेरहून जळगाव येथे येणार्या बसवर दगडफेक करणार्या एसटीच्या कर्मचार्याला सिनेस्टाईल पाठलाग करून अटक करण्यात आली. आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.
दगडफेकीमुळे पसरली होती भीती
परीवहन मंत्री अनिल परब यांनी केलेल्या आवाहनानुसार काही कर्मचार्यांनी आपल्या बसेस मार्गस्थ केल्या होत्या परंतु दगडफेकीमुळे परत एकदा कर्मचार्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अशीच घटना जळगाव जिल्ह्यात सुद्धा घडल्याने संपाला हिंसक वळण लागले की काय असा प्रश्न निर्माण झाला होता. जळगाव आगाराची पहिली बस (क्र.एम.एच.20 बी.एल.3451) जामनेर येथे रवाना झाल्यानंतर जामनेर येथून दुपारी 2 वाजता परतीचा प्रवास करीत असताना नेरी जवळील गाडेगाव घाटात एका आयशर ट्रक (क्रमांक एम.एच.04 इ.वाय. 7125) मागे उमेश आवटी नावाचा जामनेर आगाराचा वाहक लपून बसला होता. बस समोर येतात त्याने दगड बसच्या काचेवर भिरकावला.

काच फुटण्यापासून वाचला मात्र आरोपी जाळ्यात
एस.टी.बस चालक सोपान सपकाळे चालक (क्रमांक 1358) यांनी प्रसंगावधान राखून जागेवर वळण घेतल्याने पुढील मुख्य काच थोडक्यात बचावला. याप्रसंगी बसमध्ये उपस्थित प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली याच बसमध्ये साध्या वेशात बसलेल्या पोलिस व वाहक गोपाळ पाटील यांनी बसमधून उडी घेऊन संबंधित व्यक्तीचा पाठलाग केला असता तो एका शेतात मिळून आला. यासंदर्भात जामनेर पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली आहे. या प्रसंगी पोलीस ठाण्यात जामनेर आगार व्यवस्थापक कमलेश धनराळे, वाहतूक नियंत्रक संभाजी पाटील उपस्थित होते. या संदर्भात चालक सोपान सपकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार उमेश रमेश आवटी (रा.वाकडी, ता.जामनेर) याच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आलेला आहे. दरम्यान, एसटी कर्मचार्यांकडून दगडफेक झाल्याचे विविध प्रकार उघडकीस आल्यामुळे महाराष्ट्रभर सुरू असलेल्या संपावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत. कल्याण-भिवंडी बस वर कोनगाव परीसरात दगडफेक केल्याप्रकरणी एका एसटी चालकास ताब्यात घेण्यात आले आहे.
