पाचोरा शहरातून सव्वा तीन लाखांची रोकड लांबवली
पाचोरा : शहरातील एका किराणा दुकानातुन भरदिवसा ३ लाख २५ हजार रुपये व महत्वाच्या तीन नोंद वह्यांची पिशवी अज्ञात चोरट्याने लांबविल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. शहरातील रेल्वे स्टेशन रोडवर न्यु सुरेश किराणा दुकान आहे. या किराणा दुकानाचे मालक विजय सुरेशचंद कोडवाणी (४१) हे नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी ९ वाजता दुकानात दाखल झाले. त्यांचेजवळ एक पिशवी होती. त्या पिशवीत ३ लाख २५ हजार रुपये व तीन महत्त्वाच्या नोंद वह्या होत्या. ही पिशवी विजय कोडवाणी यांनी दुकानात ठेवली व ते गिऱ्हाईकांना किराणा माल देण्यात व्यस्त झाले. याचा फायदा घेत ३ लाख २५ हजार रुपये व तीन नोंद वह्या असलेली पिशवी अज्ञात चोरट्याने लांबविली. काही वेळाने विजय कोडवाणी यांनी पिशवी बघितली असता त्यांना ती आढळुन आली नाही. विजय कोडवाणी यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक मुकुंद परदेशी करीत आहे.
