दहा हजारांचे लाच प्रकरण : नगरदेवळ्याच्या खाजगी व्यापार्‍यासह पंटरची कोठडीत रवानगी


जळगाव : दिव्यांग बांधवांला 40 टक्क्यांवर दिव्यांगबाबतचे प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी दहा हजारांची लाच मागणी करून ती चोपडा ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात स्वीकारताना खाजगी पंटरांसह व्यापार्‍याला जळगाव एसीबीने मंगळवारी दुपारी सापळा रचून अटक केली होती. या प्रकरणी अनिल तुकाराम पाटील (46, रा.नगरदेवळा, ता.पाचोरा) या खाजगी पंटरासह विजय रूपचंद लढे (67, रा.नगरदेवळा, मारवाडी गल्ली, ता.पाचोरा) या व्यापार्‍यास अटक करण्यात आली होती. संशयीतांना बुधवारी अमळनेर न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

‘त्या’ डॉक्टरांची होणार चौकशी !
पारोळा तालुक्यातील कंकराज येथील 49 वर्षीय तक्रारदार हे हाताने दिव्यांग आहेत. त्यांना हाताचे दिव्यांग बाबतचे प्रमाणपत्र 40 टक्क्यांवर वाढवून देण्यासाठी व हे काम ज्या डॉक्टरांकडे आहे, ते डॉक्टर माझे ओळखीचे असल्याचे अनिल पाटील या संशयीताने तक्रारदाराला सांगत मंगळवार, 30 रोजी पंचांसमक्ष दहा हजारांची लाच मागणी केली होती. तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर संशयीताना चोपडा उपजिल्हा रुग्णालयाच्या आवारात मंगळवारी दुपारी अटक करण्यात आली होती. आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांना बुधवारी अमळनेर न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, खाजगी इसमाने दिव्यांग बांधवाला 40 टक्क्यांवर प्रमाणपत्र मिळवून देण्याची हमी एका डॉक्टरांच्या नावाने दिली आहे. हे डॉक्टर संशयीताचे ओळखीचे असल्याने यापूर्वी अशा पद्धत्तीने किती दिव्यांग प्रमाणपत्र देण्यात आले शिवाय हा डॉक्टर नेमका कोण? या प्रश्नांची उत्तरे आता आरोपींच्या पोलीस कोठडीतील चौकशीतून मिळणार आहेत. अधिक तपास जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक शशीकांत एस.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक संजोग बच्छाव व सहकारी करीत आहेत.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !