उभ्या ट्रकमधून दहा लाखांचे भंगार चोरीला : चाळीसगावातील घटना
चाळीसगाव : ऑर्डनन्स फॅक्टरीतील अल्युमिनियम प्रकारातील तब्बल दहा लाखांचे भंगार चाळीसगाव शहराजवळ उभ्या ट्रकमधून चोरट्यांनी लांबवले. ही घटना मंगळवारी रात्री चाळीसगाव-नांदगाव रस्त्यावरील पेट्रोल पंपासमोर घडली. चाळीसगाव ग्रामीण पोलिसात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
चोरट्यांचा शोध घेण्याचे आवाहन
ओडीशा येथील ऑर्डनन्स फॅक्टरीतून अल्युमिनियम तार व इतर भंगार असे एकूण 260 बॉक्स ट्रकने (एम.एच.06 ए.सी.5951) अंबरनाथ येथे नेले जात होते. मंगळवारी रोजी रात्री 12.30 ते सकाळी 6 वाजेच्या दरम्यान हा ट्रक चाळीसगाव-नांदगाव रस्त्यावरील नक्षत्र पेट्रोल पंपासमोर उभा होता. त्याचवेळी या ट्रकच्या पाठीमागील प्लॅस्टिकची ताडपत्री व दोर कापून चोरट्यांनी दहा लाखांचे भंगार अॅल्युमिनिअमचे साहित्य चोरून नेले. ट्रकचालक प्रकाश उर्फ हिरामण देवचंद भोई (रा.पाडळसे, ता.यावल जि. जळगाव) यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एएसआय भालचंद्र पाटील करीत आहे.





