एरंडोल येथील विष प्राशन केलेल्या ‘त्या’ कर्मचार्याचा मृत्यू
नातेवाईकांचा आक्रोश : दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
जळगाव : एरंडोल येथील भूमिअभिलेख कार्यालयातील प्रमुख भूमापक संजय नामदेव पाटील (52, रा.खडका, ता.चाळीसगाव) यांनी वरीष्ठांच्या जांचाला 23 नोव्हेंबर रोजी विषप्राशन केले होते. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असतानाच शुक्रवार,3 डिसेंबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेनंतर नातेवाईकांनी संताप व्यक्त करत वरीरष्ठांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली.
वरीष्ठांच्या जाचाला कंटाळून विष प्राशन
संजय पाटील हे एरंडोल येथील भूमापक कार्यालयात एम.एस. पदावर कार्यरत होते. खडका येथून ते दररोज दुचाकीने अपडाऊन करत होते. सन 2019 पासून त्यांना वरीष्ठांकडून कामाचा दबाव टाकत होते. त्यामुळे ते गेल्या अनेक महिन्यांपासून तणावात काम करत होते. हा त्रास सहन न झाल्याने संजय पाटील यांनी ऑनड्यूटी कार्यालयात विषारी औषध घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांना तातडीने एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. या प्रकरणी एरंडोल पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान, त्यांची प्रकृती खालावल्याने बुधवार, 1 डिसेंबर रोजी जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. शुक्रवार, 3 डिसेंबर रोजी दुपारी 12. 15 वाजेच्या सुमारास संजय पाटील यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. संजय पाटील यांनी मृत्यूपुर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. ती पोलिसांच्या ताब्यात असून त्यात चार वरीष्ठ अधिकार्यांची नावे असून त्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे नमूद आहे. व्ही.एन.पाटील, व्ही.एल.सोनवणे, आर.व्ही.जाधव व ठाकूर अशी या अधिकार्यांची नावे असल्याचे समजते.





दोषी अधिकार्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
या घटनेमुळे संजय पाटील यांची पत्नी रजनी, मुलगा प्रशांत आणि शालक शांताराम पाटील यांनी जिल्हा रुग्णालयात आक्रोश केला होता. संबंधित दोषी अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावे अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा कुटुंबियांसह नातेवाईकांनी घेतल्याने खळबळ उडाली.
