आमडदे बँकेतील चोरी प्रकरण : कर्मचार्‍यांनी चोरीच्या सोन्यावर तारण ठेवून काढले कर्ज


भडगाव : आमडदे, ता.भडगाव येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत कोट्यवधींचे सोने चोरीला गेल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर खळबळ उडाली होती. बँकेतील शिपायासह अन्य तिघांनी ही चोरी केल्याचे उघड झाल्यानंतर आता बँकेतील चोरी प्रकरणात कर्मचार्‍यांनीच हेराफेरी केल्याचा आणखी एक प्रकार उघडकीस आला. या बँकेतील तारण सोने काढून कर्मचार्‍यांनीच अन्य बँकेत दुसर्‍याच्या नावावर तारण ठेवत कर्ज काढल्याची बाब उघड झाल्यानंतर या प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली आहे. यामुळे या प्रकरणात अटक करण्यात आलेल्यांची संख्या आता आठ झाली आहे. इंद्रनील पाटील (भडगाव), राजेंद्र गोबा पाटील, राजेंद्र रामराव पाटील, हेमराज मधुकर पाटील (रा.आमडदे), रणजित मुरलीधर पाटील (वरखेड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

तीन कोटींचे सोने कर्मचार्‍यांनी लांबवले
आमडदे येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत तारण ठेवलेले सहा किलो सोने बँक कर्मचार्‍यांनीची चोरुन नेले होते. या सोन्याची किंमत तीन कोटी 17 लाख रुपये आहे. ही घटना मंगळवार, 30 रोजी घडली होती. यात बँकेतील शिपाई राहुल अशोक पाटील, विजय नामदेव पाटील, विकास पाटील यांनीच ही चोरी केल्याचे उघडकीस आले होते. तीनही आरोपीना पाच दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. दरम्यान, बँकेत तारण ठेवण्यात आलेल्या सहा किलो सोन्यापैकी 21 लाख 92 हजार रुपये किंमतीचे 438 ग्रॅम सोने कमी भरले. यामुळे बँकेचे मॅनेजर तन्मय अजय देशपाडे यांनी पोलिसात पुन्हा फिर्याद दिली. शेतकरी कर्जदार यांनी ठेवलेल्या तारण सोन्याची राहुल अशोक पाटील, विजय नामदेव पाटील यांनी अदलाबदल केली. एव्हढेच नाही तर तारण ठेवलेले सोने काढून ते वरील पाच जणांच्या ताब्यात दिले आणि तेच सोने या पाचही जणांच्या नावाने अन्य बँकेत पुन्हा तारण ठेवले आणि त्यावर कर्जही घेतल्याचे समोर आले आहे. या सर्वांना अटक करण्यात आली. त्यांना सोमवारपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. या चोरी प्रकरणात आरोपी वाढण्याची शक्यता असल्याची माहिती तपास अधिकारी पोलीस निरीक्षक अशोक उत्तेकर यांनी दिली.






 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !