लग्नाच्या आमिषाने फसवणूक करणार्या टोळीतील दाम्पत्य जाळ्यात
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : आरोपी भडगाव पोलिसांच्या ताब्यात
जळगाव : लग्न लावून फसवणूक करणार्या टोळीतील दोघांना शहरातील कांचन नगरातून जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. संशयीतांना अधिक कारवाईसाठी भडगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. गोकुळ रवींद्र सोनार (30) आणि सोनाली गोकुळ सोनार (28, दोन्ही रा. साकेगाव, ता.भुसावळ) असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.
दागिने घेवून नवरी झाली होती पसार
तालुक्यातील शिंदी येथील 28 वर्षीय तरूण हा विवाह योग्य झाल्यानंतर मुलगी मिळत नसल्याचे विवंचनेत असतांना सोनाली गोकुळ सोनार, गोकुळ रवींद्र सोनार (रा.साकेगाव, ता.भुसावळ), आशा नानासाहेब निकम (नाशिक), अशोक वीरसिंग खाडे (मालदा, ता.शहादा, जि.नंदुरबार) आणि गुड्डीबाई समाधान शिंपी (गाळण, ता.पाचोरा) यांनी भेट घेवून तरुणाचा विश्वास संपादन करून आमच्या ओळखीची मुलगी असल्याचे सांगितले. त्यासाठी दीड लाख रूपये खर्च करावे लागतील. त्यानुसार तरूणाच्या कुटुंबियांनी लग्नासाठी होकार दिला आणि 30 ऑगस्ट 2021 रोजी नशिराबाद येथील एका तरूणीशी लग्न लावून दिले. दरम्यान, तरूणासोबत नवविवाहिता राहिल्यानंतर मी भुसावळ येथे जावून येते, असे सांगून सोबत दागिने घेवून पसार झाली. याबाबत आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने भडगाव पोलिस ठाण्यात धाव घेतल्यानंतर नववधूसह सहा जणांवर भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.





जळगावातून आरोपींना अटक
गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयीत आरोपी हे जळगाव शहरात असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना माहिती मिळाली, त्यानुसार बुधवार, 8 डिसेबर रोजी दुपारी पथकातील पोलिस उपनिरीक्षक अमोल देवरे, हवालदार लक्ष्मण पाटील, विनोद पाटील, रणजीत जाधव, किशोर राठोड, ईश्वर पाटील यांनी कारवाई करत संशयी आरोपी गोकुळ रवींद्र सोनार (30) याला तालुक्यातील ईदगाव येथून तर सोनाली गोकुळ सोनार (28) हिला कांचन नगरातून अटक केली. दोघांना भडगाव पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले.
