प्रेयसीने फोन न उचलल्याने तरुणाची आत्महत्या
मुंबई : मुंबईतील देवनार परिसरात 24 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली मात्र पार्टीनंतर घरी पोहोचल्यानंतर प्रेयसीने फोन न उचलल्याने आत्महत्या केल्याची चर्चा आहे. मृत तरुणाचे नाव मानव ललवानी असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
रागाच्या भरात केली आत्महत्या
ट्रॉम्बे पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी सिद्धेश्वर गोवे यांनी सांगितले की, मृत तरुण आपल्या मैत्रिणीसोबत पार्टी करुन रात्री उशीरा घरी परतला. घरी पोहोचल्यानंतर मानवने रात्री जवळपास दोन वाजण्याच्या सुमारास प्रेयसीला फोन केला मात्र तिने उचलला नाही. यानंतर त्याने रागाच्या भरात गळफास घेत आत्महत्या केली. मानवच्या पालकांना टेरेसवर मानव लटकलेला आढळल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आणि तपासासाठी सीसीटीव्ही फुटेज देखील ताब्यात घेण्यात आले आहे. मानवच्या प्रेयसीचा जबाब देखील पोलिसांनी नोंदवला आहे.





