चाळीसगाव-धुळे मेमू उद्यापासून धावणार : रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे दाखवणार हिरवी झेंडी
भुसावळ : कोरोनाकाळात बंद झालेली चाळीसगाव पॅसेंजर आता मेमू स्वरूपात सोमवार, 13 डिसेंबरपासून धावण्यासाठी सज्ज झाली आहे. सोमवारी सकाळी 8.50 वाजता रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हिरवी झेंडी दाखवून मेमू गाडीचा शुभारंभ करणार आहे. पहिल्या दिवशी ट्रायल रन असल्याने केवळ एकच फेरी या गाडीची होणार आहे तर दुसर्या दिवसापासून अर्थात मंगळवार, 14 डिसेंबरपासून या गाडीच्या दोन फेर्या होतील, असे सूत्रांनी सांगितले.
-
ही बातमी महत्वाची, वाचली का- म्हाडाच्या परीक्षा पुढे ढकलल्या : पुण्यात तिघा जणांना अटक
यांची राहणार उपस्थिती
चाळीसगाव रेल्वे स्थानकावर मेमू गाडीच्या शुभारंभ कार्यक्रमास पालकमंत्री गुलाबराव पाटील, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, चाळीसगावचे खासदार उन्मेष पाटील, खासदार डॉ.सुभाष भामरे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार फारूक अन्वर शाह, धुळे महापौर प्रदीप कर्पे, चाळीसगाव नगराध्यक्षा आशालता चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. दरम्यान, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे मेमू गाडीला ऑनलाईन हिरवी झेंडी दाखवून गाडीचा शुभारंभ करतील.





-
ही बातमी महत्वाची, वाचली का- धक्कादायक ! : 25 हजारांची लाच घेताना तहसीलदार एसीबीच्या जाळ्यात
पहिल्या दिवशी होणार केवळ एक फेरी
सोमवार, 13 डिसेंबर रोजी मेमू गाडीची केवळ ट्रायल रन असल्याने एकच फेरी होणार आहे. गाडी क्रमांक 01111 चाळीसगावहून सोमवारी सकाळी 9.20 वाजता सुटल्यानंतर धुळे ती 10.25 वाजता पोहोचेल तर परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 01112 सकाळी 10.50 वाजता सुटल्यानंतर 11.35 वाजता चाळीसगावात पोहोचणार आहे.
सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा
कोरोनामुळे 24 मार्चपासून चाळीसगाव पॅसेंजर बंद करण्यात आल्याने चाकरमान्यांसह सर्वसामान्य प्रवाशांना मोठा आर्थिक फटका सोसत खाजगीसह अन्य वाहनांनी प्रवास करावा लागत होता. त्यातच महिनाभरापासून एस.टी.देखील बंद असल्याने प्रवाशांचे अतोनात हाल होत होते मात्र आता मेमू सुरू होणार असल्याने प्रवाशांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण आहे. पॅसेंजरऐवजी मेमू धावणार असल्याने भाड्याच्या दरातदेखील मोठी वाढणार आहे. मेल एक्स्प्रेप्रमाणे भाड्याची आकारणी केली जाणार असल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले. दिवसातून दोन वेळा या गाडीच्या फेर्या होतील शिवाय रविवारी मात्र दिवसभर मेमू बंद ठेवण्यात येणार आहे तर प्रवाशांना कोरोना नियमांचे पालन केल्यानंतरच या गाडीत प्रवेश दिला जाणार आहे शिवाय कोरोनाचे दोन डोस प्रवाशांना अनिवार्य आहेत.
मंगळवारपासून मेमूच्या दोन फेर्या होणार
मेमू गाडी क्रमांक 01303 ही चाळीसगाव येथून पहाटे 6.30 निघाल्यानंतर धुळ्यात 7.35 वाजता पोहोचणार आहे तर मेमू गाडी क्रमांक 01313 सायंकाळी 5.30 वाजता चाळीसगाव येथून सुटल्यानंतर 6.35 वाजता धुळ्यात पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासात धुळे येथून गाडी क्रमांक 01304 सकाळी 7.50 वाजता सुटल्यानंतर सकाळी 8.55 वाजता चाळीसगावात पोहोचणार आहे तसेच गाडी क्रमांक 01314 सायंकाळी 7.20 वाजता सुटल्यानंतर रात्री 8.25 वाजता चाळीसगावात पोहोचणार आहे.
-
ही बातमी महत्वाची, वाचली का- काय सांगता ! पंतप्रधान नरेंद्र मोदीचे ट्वीटर अकाऊंटच झाले हॅक
