ऐनपूरात दंगल : 19 जणांविरोधात गुन्हा : सहा अटकेत
निंभोरा पोलिसांची घटनास्थळी धाव : एका गटाच्या 19 जणांविरोधात दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा : सहा जणांना अटक
रावेर : तालुक्यातील ऐनपूर येथे घरासमोर गोड भात का शिजवतात? या कारणावरून वाद उफाळल्याने एकाच समाजाच्या दोन गटातील शाब्दीक वाद हाणामारीवर पोहोचला. एका गटाकडून तुफान दगड-विटांचा मारा करण्यात आला तसेच लोखंडी रॉड तसेच लाठ्या-काठ्यांचा वापर करण्यात आल्याने दुसर्या गटातील नऊ जण जखमी झाले. ही धक्कादायक घटना रविवारी रात्री 8.30 वाजेच्या सुमारास घडली. याबाबतची माहिती मिळताच निंभोरा पोलिस स्टेशनचे सहा.पोलिस निरीक्षक स्वप्निल उनवणे व सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेत शांतता प्रस्थापीत केली. या प्रकरणी एका गटाच्या 19 संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहा आरोपींना अटक करण्यात आली.
19 जणांविरोधात दंगलीचा गुन्हा
या प्रकरणी निंभोरा पोलिसात हैदर अली सैय्यद अली (ऐनपूर, ता.रावेर) यांनी फिर्याद दिल्यावरून शेख रशीद शेख अजीज, भुरी बी.शेख रसीद, शेख छोटू शेख अजीज, शेख असलम शेख अजीज, शेख हमीद शेख अजीज, शेख फरीद शेख अजीज, शेख युसूफ शेख सांडू, आएशा बी.हैदरअली, शेख अमजद शेख युसूफ, शेख सलीम शेख अब्दुल, शबाना शेख सलीम, शेख समीर शेख सलीम, शेख आरीफ शेख.आयुब, रऊफ शेख अयुब, शे.सानु शे.हारूण, शेख राजू शे.ईस्माईल, शेख अन्वर शेख रसुल, शेख अफजल शेख काल्या, शेख नबी शेख ईस्माईल (सर्व रा.ऐनपूर, ता.रावेर) यांच्याविरोधात गुरनं.165/2021, भादंवि 143, 147, 149, 323, 324, 326, 504, 506, 336, 337 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. मुख्य आरोपी शेख रशीद शेख अजीजसह सहा आरोपींना निंभोरा पोलिसांनी अटक केली आहे. तपास सहा.निरीक्षक स्वप्नील उनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार ज्ञानेश्वर चौधरी करीत आहेत.
नऊ जखमींवर रावेरसह जळगावात उपचार
शनिवारी दुपारी तक्रारदार तथा व्यवसायाने मिस्तरी असलेल्या हैदर अली सैय्यद अली यांच्या घरासमोर गोड भात शिजवल्यानंतर याबाबत विचारणा केल्यानंतर आरोपींना राग आल्यानंतर त्यांनी दगड-विटांचा मारा केला तसेच हातात लोखंडी रॉड, लाठ्या-काठ्या घेवून हल्ला केला. या हल्ल्यात तक्रारदारासह शेख युसूफ शेख शौकत, जुबेर खान आलमगीर खान, अकिलाबी आबीद, शेख वाहब शेख सलीम, शेख जाकिर शेख हसन, आबीद खान शरीफ खान, कुरशीतबी शेख फजल, मुजफ्फर सैय्यद रहेमत अली (सर्व रा.ऐनपूर, ता.रावेर) हे जखमी झाले आहेत. जखमींवर रावेर ग्रामीण रुग्णालयासह जिल्हा सामान्य रुग्णालयात तसेच साकेगाव हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू आहेत.


