कोर्टातून केस का काढली? म्हणत एकाच्या डोक्यात चाकू मारला : चाळीसगाव तालुक्यातील घटना
चाळीसगाव : कोर्टातून केस का काढली? असे विचारत शिविगाळ करीत तालुक्यातील पातोंडा येथील 58 वर्षीय व्यक्तीच्या डोक्यावर एकाने चाकूने हल्ला केल्याची घटना रविवार, 12 डिसेंबर रोजी रात्री 10 वाजता घडली. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
अचानक केला चाकूहल्ला
चाळीसगाव शहरातील पातोंडा येथील नाना माणिक शिरसाठ (58) हे रविवारी रात्री 10 वाजता घरासमोर दुचाकी उभी करत असताना संशयीत सागर मनोहर शिरसाठ, मनोहर रामदास शिरसाठ, लताबाई रामदास शिरसाठ व सोनाबाई रामदास शिरसाठ (सर्व रा.पातोंडा, ता.चाळीसगाव) आले व त्यांनी कोर्टातून केस का काढली? असे विचारत शिविगाळ सुरू केली. शिविगाळ करू नका, असे सांगितल्यानंतर सागर शिरसाठ याने खिशातून चाकू काढून नाना शिरसाठ यांच्या डोक्याच्या मध्यभागी मारत गंभीर दुखापत केली तर नाना यांच्या पत्नी लताबाई व आई धनाबाई या भांडण सोडविण्यासाठी आले असता मनोहर रामदास शिरसाठ यांनी जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात नाना माणिक शिरसाठ यांच्या फिर्यादीवरून सागर मनोहर शिरसाठ, मनोहर रामदास शिरसाठ, लताबाई रामदास शिरसाठ व सोनाबाई रामदास शिरसाठ (सर्व रा.पातोंडा, ता.चाळीसगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक के.के.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.





