शासकीय कामात अडथळा : दोघांना शिक्षा
जळगाव : शासकीय कामात अडथळा निर्माण करणार्या दोन आरोपींना एक महिना कैद व दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयाने मंगळवार, 14 डिसेंबर रोजी दुपारी सुनावली.
शासकीय अधिकार्यांचा रोखला होता मार्ग
जळगाव येथील सामाजिक वनीकरण विभागात कार्यरत असलेल्या सहाय्यक संचालक अमितराज जाधव हे 13 ऑक्टोंबर 2016 रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास त्यांचे सहकारी उपसंचालक सुरेंद्र देवाजी वाढई, मनोजकुमार निंबाजी खैरनार आणि चालक वसंत सपकाळे असे सर्वजण वाढई यांच्या कॅबीनमधून शासकीय कामासाठी बाहेर जाण्यास निघाले होते. त्यावेळेस खटल्यातील आरोपी प्रमोद रामदास इंगळे व रवींद्र दामू सोनवणे हे वाढई यांच्या कॅबिनच्या बाहेर दरवाजाजवळ आले. व विचारले की, आमच्या तक्रारीवर काय कारवाई झाली हे सांगा याचा आग्रह दोघांनी धरला व शासकीय कर्मचार्यांचा जाण्याचा मार्ग रोखून धरला. त्यामुळे चौघांना कॅबीनमध्ये परत जाण्यास भाग पाडले. दरम्यान प्रमोद इंगळे आणि रविंद्र सोनवणे यांनी सहाय्यक संचालक अमितराज जाधव यांच्याशी हुज्जत घालत सरकारी कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी अतिमराज जाधव यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.





एका महिन्याची शिक्षा व दंड
हा खटला जळगाव येथील अतिरीक्त सत्र न्या.एस.एन माने-गाडेकर यांच्या न्यायालयात चालला. सरकार पक्षातर्फे एकूण पाच साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयासमोर आलेल्या साक्षीपुरावे अंती न्यायालयाने आरोपी प्रमोद रामदास इंगळे आणि रवींद्र दामू सोनवणे यांना दोषी मानत दोघांना एक महिन्याची शिक्षा व 500 रुपयांचा दंड आणि दंड न भरल्यास 3 दिवस साधी कैद अशी शिक्षा सुनावण्यात आली. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता रमाकांत सोनवणे यांनी युक्तिवाद केला तर पैरवी अधिकारी विजय पाटील यांनी कामकाज पाहिले.
