भुसावळात रेल्वेतील सेवानिवृत्त कर्मचार्‍याच्या घरात चोरी

15 तोळे सोन्यांसह रोकड मिळून सुमारे सात लाखांचा ऐवज चोरट्यांनी लांबवला : पोलिस अधिकार्‍यांची घटनास्थळी धाव


भुसावळ : शहर व तालुक्यात जुन्या चोर्‍यांसह घरफोड्यांचा तपास लागत नसतानाच चोरट्यांनी ग्रामीण भागात धाडसी घरफोडी करीत पोलिसांच्या गस्तीलाच आव्हान दिले आहे. भुसावळ तालुक्यातील साकरी येथील नवीन वस्तीमधील शिवम नगरात सात लाखांची घरफोडी झाल्याची बाब शुक्रवारी सकाळी उघडकीस आल्याने या भागातील रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे. स्थानिक रहिवासी व तथा सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी मधुकर तुकाराम साबरे यांच्या बंद घराचा कडीकोयंडा, कुलूप तोडून चोरट्यांनी रोकड व 15 तोळे वजनाचे दागिने लांबवले असून या प्रकरणी शुक्रवारी रात्री तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

बंद घराला केले टार्गेट
रेल्वेतील निवृत्त तिकीट तपासणीस मधुकर तुकाराम साबरे हे साकरी येथील नवीन वस्तीमध्ये असलेल्या शिवम नगरात वास्तव्यास आहेत. कामानिमित्त ते पुण्याला गेल्याने घर बंद असल्याची चोरट्यांनी संधी साधली. घराचा कडी-कोयंडा चोरट्यांनी तोडून चोरट्यांनी कपाटातील ठेवलेले सोन्याचे सुमारे 15 तोळे वजनाचे दागिने तसेच रोकड आदी मिळून साडेसहा ते सात लाखांचा ऐवज लांबवला. ही बाब शुक्रवारी सकाळी उघडकीस येताच पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे व तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक विलास शेंडे व त्यांच्या सहकार्‍यांनी तत्काळ घटनास्थळ गाठत पाहणी केली. घरात सर्व साहित्य अस्ताव्यस्त विखुरलेले यावेळी दिसून आले. ग्रामीण भागात झालेल्या चोरीनंतर या भागातील रहिवाशांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.


घराभोवतीच घुटमळले श्वान
धाडसी चोरीनंतर जळगाव येथून श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. श्वानाला तुटलेले कुलूप हुंगवल्यानंतर श्वानाने घराच्या अवती-भोवती चकरा मारल्या व नंतर श्वान घुटमळले. यावेळी ठसे तज्ज्ञांनी तेथील काही ठिकाणचे ठसे टिपे. यावेळी तालुका पोलिस ठाण्याचे हवालदार शाम मोरे, प्रेमचंद सपकाळे आदी पोलिस कर्मचारी उपस्थित होते.

रात्री उशिरा पोलिसात गुन्हा दाखल
शुक्रवारी पहाटेच्या सुमारास साबरे यांच्या भाडेकरूला घरफोडी झाल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांनी साबरे यांना माहिती दिली. साबरे यांनी ही घटना भुसावळात राहणारे भाऊ व मित्र परीवाराला कळवल्यानंतर त्यांनी धाव घेत पाहणी केली. साबरे हे रात्री पुण्यातून आल्यानंतर गेलेल्या ऐवजाची सविस्तर माहिती कळणार आहे तर शुक्रवारी रात्री त्यांच्या नातेवाईकांच्या तक्रारीनंतर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !