भुसावळात भर वस्तीत ट्रक शिरला : तरुणाचा जागीच मृत्यू ; जमाव संतप्त

भुसावळ शहरातील यावल रोडवरील डॉ.आंबेडकर नगरातील धक्कादायक घटना : दोषींवर कारवाईसाठी रहिवासी संतप्त


भुसावळ : भरधाव आयशर वाहन यावल रोडवरील डॉ.आंबेडकर नगरातील वस्तीत शिरल्यानंतर एका घराला धडक बसली व या अपघातात घरातील कर्त्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर तरुणाचा भाऊ जखमी झाला. हा अपघात शनिवार, 9 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजेच्या सुमारास घडला. अपघातानंतर संतप्त जमावाने चालकास चोपून काढले तर दोषीवर कारवाईच्या मागणीसाठी रहिवाशांनी रास्ता रोखण्याचा प्रयत्न करीत संतप्त भावना व्यक्त केल्या. या अपघातात सम्राट (गोलू) दादाराव इंगळे (22, डॉ.आंबेडकर नगर, भुसावळ) या तरुणाचा मृत्यू झाला तर भाऊ निलेश इंगळे हा जखमी झाला आहे.

भुसावळात रेल्वेतील सेवानिवृत्त कर्मचार्‍याच्या घरात चोरी : सात लाखांचा मुद्देमाल लंपास

मद्यधूंद वाहन चालकाचा प्रताप
भरधाव आयशर ट्रक (एम.एच.46 एएफ 5554) वरील मद्यधूंद चालकाने शनिवारी सकाळी जळगाव रोडवरील धम्म नगरात एकाला धडक दिली व त्यानंतर यावल रस्त्यावरून वाहन जात असताना साईजीवन सुपर शॉपसमोर एका खांबाला हे वाहन धडकले व त्यानंतर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हे वाहन यावल रोडवरील डॉ.आंबेडकर नगरातील वस्तीतील एका घराला जावून धडकल्याने सम्राट इंगळे हा तरुण जागीच ठार झाला तर भाऊ निलेश इंगळे जखमी झाला. अपघातानंतर संतप्त जमावाने चालकाला चोप दिला तर शहर पोलिसांनी वेळीच धाव घेत चालकाला ताब्यात घेतले.


पदाधिकार्‍यांनी काढली जमावाची समजूत

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर रीपाइं उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे, रीपाइं जिल्हाध्यक्ष राजू सूर्यवंशी, माजी नगरसेवक जगन सोनवणे आदींनी घटनास्थळी धाव घेत संतप्त जमावाची बाजू ऐकून घेत त्यांना शांत राहण्याचे आवाहन करीत मदत मिळवून देण्याची ग्वाही दिली. पदाधिकार्‍यांनी दाखवलेल्या सामंजस्याच्या भूमिकेमुळे वातावरण निवळले. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती अध्यक्ष शरद सोनवणे, पप्पू सुरडकर, भीमज्योत शेजवळ, माजी नगरसेवक अमोल इंगळे, सुनील राखुंडे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शनिवारी दुपारच्या सुमारास अपघातग्रस्त आयशर वाहन के्रनद्वारे पोलिस वसाहतीतील जुन्या उपअधीक्षक कार्यालयाच्या आवारात आणण्यात आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !