आभोडा गावातील वहिनीवर चाकूहल्ला : दिराविरोधात गुन्हा
कौटुंबिक कारणावरून सुरू असलेल्या वादात ‘भावबंदकी’ उफाळली : जखमी महिलेवर रावेर ग्रामीण रुग्णालयात उपचार
रावेर : दोन भावांचे भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या वहिनीवर चाकूने हलला करण्यात आल्याची घटना तालुक्यातील आभोडा येथे घडली. याप्रकरणी रावेर पोलिस ठाण्यात दिराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
दिराविरोधात पोलिसात गुन्हा
रावेर तालुक्यातील आभोडा येथे वामन जगन वाघ हे पत्नी सविता वाघ यांच्यासह वास्तव्याला आहे. रविवार, 10 एप्रिल रोजी वामन जगन वाघ यांचे भाऊ बळीराम जगन वाघ यांचे कौटुंबिक कारणावरून घरात भांडण सुरू होते. पती व दिराचे भांडण पाहून सविता वाघ यांनी भांडण सोडविण्यासाठी मध्यस्थी केली असता दिर बळीराम जगन वाघ याने तीक्ष्ण चाकूने वार करून सविता वाघ यांना जखमी केले व जीवे ठार मारण्याची धमकी दिली. यात सविता वाघ या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने रावेर रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. सविता वाघ यांच्या फिर्यादीवरून बळीराम जगन वाघ याच्या विरोधात रावेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक विशाल सोनवणे करीत आहे.
