प्रवासी झोपताच चोरट्यांनी सव्वाआठ लाखांचा ऐवज लांबवला

गोरखपूर एक्स्प्रेसमधील घटना : वातानुकूलित बोगीतील प्रवासही ठरतोय असुरक्षित


भुसावळ : रेल्वेतील वाढत्या चोर्‍यांमुळे सर्वसामान्य प्रवासी त्रस्त असतानाच आता वातानुकूलित (एसी) डब्यातही चोर्‍या होवू लागल्याने रेल्वे प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. अप 12166 गोरखपूर-एलटीटी एक्स्प्रेसने महु ते ठाणे प्रवास करणार्‍या ठाण्यातील दाम्पत्याची पर्स चोरट्यांनी भुसावळ-जळगाव दरम्यान लांबवली. या बॅगेत दहा हजारांच्या रोकडसह तब्बल आठ लाख 26 हजारांचे दागिने असल्याने या धाडसी चोरीनंतर मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मनमाड पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर तो भुसावळ लोहमार्ग पोलिसात वर्ग करण्यात आला.

प्रवासी झोपताच लांबवली बॅग
तक्रारदार उषारॉय रामश्रय रॉय (प्लॉट नंबर 404, हिरानंदानी इस्टेट, पोरबंदर, पाथर्डी फाटा, ठाणे) या पती रामश्रय रॉय यांच्यासह बुधवार, 13 एप्रिल 2022 रोजी अप 12166 गोरखपूर-एलटीटी एक्स्प्रेसच्या एसी कोच ए- 1 च्या बर्थ क्रमांक 27 व 29 वरून महु ते ठाणे प्रवास करीत असताना भुसावळ-जळगाव रेल्वे स्थानकादरम्यान दाम्पत्यास झोप लागली व ही संधी चोरट्यांनी हेरत प्रवाशांची छोटी पर्स लांबवली.


भुसावळ लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल
या पर्समध्ये 10 हजारांची रोकड, दोन लाख रुपये किंमतीचा व पाच तोळे वजनाचा सोन्याचा हार, एक लाख रुपये किंमतीची व अडीच तोळे वजनाची चैन, एक लाख रुपये किंमतीचे मंगळसूत्र, एक लाख 20 हजार रुपये किंमतीचे कर्णफुल व कानचैन, 40 हजार रुपये किंमतीचे कानातील झुमके, एक लाख 80 हजारांच्या सोन्याच्या बांगड्या, 60 हजार रुपये किंमतीची सोन्याची अंगठी, 16 हजार रुपये किंमतीची सोन्याची कानातील रींग मिळून एकूण आठ लाख 26 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल होता. मनमाड रेल्वे स्थानक आल्यानंतर प्रवाशांना जाग आल्यानंतर त्यांनी रेल्वेतील तिकीट निरीक्षक व सुरक्षा यंत्रणांना माहिती दिल्यानंतर मनमाड लोहमार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला व कार्यक्षेत्र भुसावळ असल्याने भुसावळात हा गुन्हा वर्ग झाला. तपास पोलिस उपनिरीक्षक सुरेश साळुंके करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !