प्रेयसीच्या घरातील सोने लांबवणार्‍या भामटा प्रियकर पोलिसांच्या जाळ्यात


औरंगाबाद : कपाटातील 12 तोळे सोने पाहून प्रियकराच्या तोंडाला पाणी सुटले व त्याने प्रेयसीच्या घरातील सोन्याची पिशवीच हिसकावून पोबारा केला होता. तब्बल आठ महिन्यांनी प्रियकरास औरंगाबाद गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. प्रफुल्ल रमेश जगताप (21, रा. माऊलीनगर, बीड बायपास) असे अटकेतील आरोपी प्रियकराचे नाव आहे.

अल्पवयीन मुलीस जाळ्यात ओढले
प्रफुल्ल मुंबईतील गोवंडी भागातील इमारतीमध्ये राहत होता. त्याच इमारतीमधील व्यावसायिक दाम्पत्याच्या 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीस त्याने प्रेमाच्या जाळ्यात ओढले. ऑगस्ट 2021 मध्ये त्याने प्रेयसीला आपल्या घरी कार्यक्रम असल्याचे सांगितले. तिच्या आईची एक सोन्याची पोत आपल्या आईला घालण्यासाठी देण्याची मागणी केली. तिने कपाट उघडले. 12 वर्षांच्या लहान भावासमोरच तिने एक पोत देण्यासाठी पिशवी काढली. त्यात 12 तोळे सोन्याचे दागिने होते. ते पाहून प्रफुल्लने प्रेयसीला धक्का देत तिच्या हातातून सोन्याची पिशवी हिसकावून पळ काढला. मुलीच्या आईला काही दिवसांनी सोने कपाटात दिसले नाही. त्यामुळे मुलांना विचारपूस केल्यानंतर या प्रकाराचा भंडाफोड झाला.




मुंबईत दाखल होता गुन्हा
या प्रकरणी शिवाजीनगर, मुंबई पोलीस ठाण्यात प्रफुल्लच्या विरोधात गुन्हा नोंद झाला. प्रफुल्ल सापडत नव्हता. गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक कल्याण शेळके यांना तो बीड बायपास परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून शेळके, सहायक फौजदार रमाकांत पटारे, हवालदार विजय निकम, राजेंद्र साळुंके, संदीप सानप, नितीन देशमुख यांच्या पथकाने सापळा रचून त्यास अटक केली. आरोपीने कबुली दिल्यानंतर त्यास मुंबई पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

एक नव्हे अनेक गर्लफ्रेंड
आरोपी प्रफुल्लने चोरलेले 12 तोळे सोने एका दुसर्‍या मैत्रिणीच्या मदतीने एका सोनाराकडे गहाण ठेवले आहे. याशिवाय त्याच्या मोबाइलमध्ये अनेक गर्लफ्रेंडची छायाचित्रे पोलिसांच्या चौकशीत आढळून आली. एकीला फसवले. दुसरीच्या मदतीने सोने गहाण ठेवले. त्याशिवाय इतरही मुलींना फसवत असल्याची कबुलीही त्याने पोलिसांना दिल्याने आरोपीची सखोल चौकशी सुरू आहे.

जळगावात सुप्रीम कंपनीतील कर्मचार्‍याचा निर्घृण खून : आरोपी जळगाव गुन्हे शाखेच्या जाळ्यात


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !