पशु वैद्यकीय अधिकार्‍यांअभावी दवाखाना वार्‍यावर

खिर्डी खुर्द गावातील संतापजनक प्रकार : पशूपालकांची प्रचंड गैरसोय : वर्षभरापासून वीजपुरवठा गुल


खिर्डी : खिर्डी बु.॥ येथे श्रेणी एकचा पशुवैद्यकीय दवाखाना असून गत वर्षांपासून निवासी पशु वैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे पशूपालकांना जनावरांवर उपचार करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या दिवसात पशूंना होणारे आजार पाहता तातडीने या दवाखान्यात पशू वैद्यकीय अधिकार्‍यांची नियुक्ती करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

प्रभारी अधिकार्‍यांकडून दोन दिवस सेवा
या दवाखान्याला खिर्डी खुर्द, खिर्डी बु.॥, भामलवाडी, पुरी, गोलवाडे, निंभोरा, सिन्नुर, दसनुर, बलवाडी, आंदलवाडी अशी दहा गावे जोडण्यात आली आहे मात्र कायमस्वरूपी पशुवैद्यकीय अधिकारी नसल्यामुळे येथे सावदा येथील श्रेणी एकचे डॉ.राजपुत यांच्याकडे अतिरीक्त पदभार देण्यात आला आहे. तेदेखील मंगळवार व शुक्रवार असे आठवड्यातून दोन दिवस येत असल्याने पशूपालकांची गैरसोय होत आहे. पशुधनाच्या उपचारासाठी पशुपालकांची नाईलाजास्तव खाजगी डॉक्टरांना शोधावे लागत असून त्यामुळे मोठा आर्थिक फटकाही त्यांना सोसावा लागत आहे. यापूर्वी येथे कायमस्वरूपी डॉ. वडजे कार्यरत होते परंतु त्यांची बदली नाशिक येथे झाल्यामुळे ही जागा गेल्या वर्षापासून रीक्त आहे.

शेतकर्‍यांच्या पशूधनावर संकट
खिर्डीतील दवाखान्याशी दहा गावांचा संपर्क येत असल्यामुळे येथे गुरांची संख्या जास्त असल्याने शेतकरी वर्ग व पशुपालक अगोदरच नैसर्गिक संकटांनी त्रस्त आहे मात्र त्यातच पशूधनावरही संकट आल्यानंतर उपचारासाठी पशूवैद्यकीय अधिकारी नसल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. पशुपालकांना जनावरांवर उपचार कोठे करावे, असा प्रश्र पडला आहे. सध्या दोन परीचर, एक वर्णपचार (ड्रेसर) कर्मचार्‍यांवर येथील पशु वैद्यकीय दवाखान्याचा कारभार सुरू असलातरी स्थानिक व लगतच्या दहा किलोमीटर अंतराच्या परीसरातील शेतकर्‍यांच्या पशूधनावर उपचारासाठी पशूवैद्यकीय अधिकार्‍याची आवश्यकता असल्याने दखल घेण्याची अपेक्षा आहे.

वर्षभरापासून दवाखाना अंधारात
पशुवैद्यकीय दवाखान्यात तब्बल एक वर्षांपासून विद्युत मिटर सुध्दा नसुन दवाखान्याची बत्ती गुल झाली आहे. जनावरांच्या लसी व औषधी खराब न होण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवाव्या लागतात मात्र वर्षभरापासून लाईटही नसल्याने कर्मचारी स्वतःच्या घरातील फ्रीजमध्ये जनावरांच्या लसी व औषधी ठेवत असून परीचर व वर्णपचारक (ड्रेसर) पशुपालकांना घरोघरी सेवा देत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !