यावल तालुक्यातील तोतया डॉक्टरांचा सुळसुळाट : कारवाईबाबत प्रशासनाला ‘साकडे’
यावल : शहरासह तालुक्यात बनावट डॉक्टरांकडून वैद्यकीय व्यवसाय सुरू असून या बनावट डॉक्टरांविरुद्ध प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी अन्यथा तालुक्यातील सर्व डॉक्टर्स उपोषण व तीव्र आंदोलन करतील, असा इशारा यावल तालुका डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने तहसील कार्यालयात नायब तहसीलदार आर.डी.पाटील यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
तहसील प्रशासनाला निवेदन
यावल तालुका डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरासह तालुक्यात अनेक बनावट डॉक्टर्स वैद्यकीय व्यवसाय करीत आहेत. या डॉक्टरांकडे कोणतीही वैद्यकीय पदवी नसल्याचे निवेदनात नमूद आहे. या बनावट डॉक्टरांनी कोरोना काळातही कोणताही प्रोटोकॉल न पाळता अनधिकृत व्यवसाय सुरू ठेवत संसर्ग वाढवला. बनावट डॉक्टर सामान्य रुग्णांच्या जीविताशी खेळ खेळत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला. प्रशासनाने अद्याप त्यांच्यावर कारवाई केली नसल्याने यावल तालुका डॉक्टर्स असोसिएशन असोसिएशनकडून कारवाईची मागणी करण्यात आली आहे अन्यथा सर्व डॉक्टर्स मंडळी उपोषण व तीव्र आंदोलन करतील,असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.


यांच्या निवेदनावर स्वाक्षर्या
निवेदनाच्या प्रती जिल्हा शल्य चिकित्सकासह, तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र यांनाही देण्यात आल्या आहेत. निवेदनावर डॉ.रमेश पाचपोळे, डॉ.मनोज वारके, डॉ.धीरज पाटील, डॉ.कुंदन फेगडे, डॉ.अनिरुद्ध सरोदे, डॉ.गणेश रावते, डॉ.सतीश यावलकर, डॉ.सुरेश महाजन यांच्यासह औषधी विक्रेत्याच्या सह्या आहेत.