मुक्ताईनगर तालुक्यातील ग्रामसेवकास मारहाण
शासकीय कामात अडथळा अन् विनयभंग ; मुक्ताईनगरात परस्पर विरोधी तक्रारी
Village servant beaten in Muktainagar taluka मुक्ताईनगर : तालुक्यातील एका गावातील ग्रामसेवकास मारहाण करीत शासकीय कामात अडथळा निर्माण करण्यात आल्याने मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. दुसर्या घटनेत ग्रामसेवकाविरोधात मात्र विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.
शासकीय कामकाजात अडथळा
मुक्ताईनगर तालुक्यातील एका गावातील ग्रामसेवक योगेश शिवाजी पवार (42) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शनिवार, 8 ऑक्टोंबर रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास ग्रामपंचायत कार्यालयात शासकीय काम करीत असताना संशयीत योगेश बाळकृष्ण मुळक आणि एकाने कार्यालयात येत योगेश पवार यांना शिवीगाळ केली. त्यांना शासकीय कार्यालयात शिविगाळ करू नका, असे म्हणताच योगेश मुळक याने योगेश पवार यांना पाठीमागून घरुन ठेवत शिवीगाळ केली तर दुसर्याने देखील शिवीगाळ करुन चप्पल ने तीन वेळा योगेश पवार यांच्या गालावर मारले तसेच बुक्क्याने पोटावर मारुन जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर कार्यालयातील टेबलावर असलेले शासकीय काम करण्याचे कृती आराखडाचे कागदपत्र फाडुन शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्याचा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

50 वर्षीय महिलेकडून विनयभंगाचा गुन्हा
मुक्ताईनगर तालुक्यातील एका गावातील 50 वर्षीय महिलेच्या घरी जात विनयभंग केल्याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात संशयीत आरोपी ग्रामसेवक योगेश शिवाजी पवार याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसात केलेल्या तक्रारीनुसार तालुक्यातील एका गावातील 50 वर्षीय महिलेच्या घरी जात तुझा पती आमच्या विरोधात अर्ज करीत आहे, आपण ते सर्व जमवून घेवू ते अर्ज मागे घेण्यास सांग असे म्हणत महिलेचा हात ओढत ग्रामसेवकाने विनयभंग केल्याचा आरोप आहे. तपास पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार श्रावण जवरे करीत आहेत.