मोरबी दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली 141 वर


141 tourists died in Morbit bridge collapse in Gujarat मोरबी : गुजरातच्या मोरबी येथे मच्छू नदीवरील एक केबल पूल रविवारी संध्याकाळी सात वाजता कोसळल्याची दुर्दैवी घटना घडली होती. या घटनेत आतापर्यंत 141 पर्यटकांचा मृत्यू झाल्याचा आकडा समोर आला असून मृतांचा आकडा सातत्याने वाढत असल्याने चिंता वाढली आहे. आतापर्यंत 177 जणांना वाचवण्यात आले असून जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, पुलाच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या एजन्सीविरोधात 304, 308 आणि 114 या कलमांतर्गत क्रिमिनल केस दाखल करण्यात आली आहे.

140 वर्षे जुना केबल पूल
मोरबी येथील हा केबल किंवा सस्पेन्शन पूल 140 वर्षे जुना असून त्याची लांबी 765 फूट आहे. या पुलाला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. 20 फेब्रुवारी 1879 रोजी या पुलाचे उद्घाटन मुंबई प्रांताचे तत्कालीन गव्हर्नर रिचर्ड टेम्पल यांनी केले होते. मोरबी येथे मच्छू नदीवर हा केबल पूल बांधण्यासाठी 3.5 लाख रुपये खर्च आला होता. या पुलाच्या बांधकामासाठी सारे सामान इंग्लंडहून आणण्यात आले होते.





ओरेवा ग्रुपकडे होती देखभालीची जबाबदारी
मच्छू नदीवरील या पुलाच्या देखभालीची जबाबदारी सध्या ओरेवा ग्रुपकडे सोपविण्यात आली होती. त्यासंदर्भात ही कंपनी व मोरबी नगरपालिकेमध्ये एक करार झाला होता. ओरेवा ग्रुप या कंपनीने मार्च 2022 ते मार्च 2037 या 15 वर्षांच्या कालावधीत पुलाची देखभाल करावी, असे या कराराद्वारे ठरविण्यात आले होते. पुलाची सुरक्षा, साफसफाई, टोलवसुली, पुलाच्या देखरेखीसाठी लागणारा कर्मचारीवर्ग नेमणे अशी अनेक कामे ओरेवा कंपनीद्वारे पार पाडली जात होती. मोरबी येथील केबल पूल कोसळण्याच्या घटनेस भाजप जबाबदार असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. या पुलाच्या केलेल्या दुरुस्तीकामाची नीट पाहणी झाली होती का, याची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.

लष्कराची टीम मध्यरात्री दाखल
बचाव कार्यात लष्कर, हवाई दल आणि नौदलासह, अग्निशमन दल आणि एनडीआरएफचीही मदत घेतली जात आहे. यात आतापर्यंत 177 जणांना वाचवण्यात यश आल्याची माहिती समोर आली असून रात्री जवळपास तीन वाजता लष्कराची टीम या ठिकाणी पोहोचली. आम्ही मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहोत. एनडीआरएफच्या टीमकडूनही बचावकार्य सुरू आहे, अशी माहिती भारतीय लष्कराचे मेजर गौरव यांनी दिली.

अमित शाहंनी व्यक्त केलं दु:ख
या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. मोरबी दुर्घटनेत अनेकांचे प्राण गेले ही गोष्ट दुर्दैवी आहे. यात प्राण गमावणार्‍यांच्या कुटुंबीयांप्रती मी संवेदना व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया शाह यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांची घटनास्थळी धाव
रविवारी या ठिकाणी लोक फेरफटका मारण्यासाठी आले होते, तेव्हाच ही घटना घडली. यानंतर अग्निशमन दलाच्या टीम, रुग्णवाहिका, स्थानिक प्रशासन आणि डॉक्टरांची टीम घटनास्थळी पोहोचली. स्थानिकांनी बचावकार्यात मदत केली. यानंतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि स्थानिक प्रशासनही घटनास्थळी दाखल झालं. लष्कर, हवाईदल, नौदल, एनडीआरएफ, एसडीआरएफच्या टीमनं रात्रभर बचावकार्य केल्याची माहिती गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी दिली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !