सुरक्षा रक्षकांच्या नोंदणीसाठी चार लाख 80 हजारांची लाच : धुळे जि.प.तील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या फिटरसह सिक्युरिटी एजन्सीचा सुपरवायझर जळगाव एसीबीच्या जाळ्यात
गणेश वाघ
Dhule ZP Bribery Case भुसावळ (बुधवार, 12 ऑगस्ट 2026) : सुरक्षा रक्षक मंडळात सुरक्षा रक्षकांची नोंदणी करण्यासाठी तडजोडीअंती चार लाख 80 हजारांची लाच स्वीकारताना धुळे जिल्हा परिषदेतील सार्वजनिक विभागातील फिटर (सध्या चार्ज क्लार्क) पुरुषोत्तम मंगाजी वाघ (50) व सिक्युरिटी एजन्सीचा सुपरवायझर बारकू काळू पाटील (60, बाबाजी मंदिरा, गणेश मंदिराजवळ, धुळे) यांना धुळे एसीबीने पारोळ्यात बुधवारी सायंकाळी अटक केली आहे. या कारवाईने धुळ्यासह जळगावातील लाचखोर अधिकार्यांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली.
असे आहे लाच प्रकरण
जळगाव एसीबीकडे आलेल्या तक्रारीनुसार, मूळ तक्रारदार हे गेल्या 14 महिन्यांपासून तात्पुरत्या स्वरूपात सुरक्षा रक्षक म्हणून जिल्हा परिषद, धुळे येथे नोकरीस आहेत. 17 ऑक्टोबर 2013 च्या शासन नियमानुसार खाजगी सुरक्षा एजन्सीत सलग 60 दिवस काम केल्यानंतर संबंधित सुरक्षा रक्षकाची सुरक्षा रक्षक मंडळात ‘सुरक्षा रक्षक’ म्हणून नियुक्ती केली जाते. यासाठी तक्रारदारासह चौघा सुरक्षा रक्षकांनी धुळे जिल्हा परिषदेत पुरूषोत्तम वाघ व खाजगी एजन्सीचा सुपरवायझर बारकू पाटील यांची भेट घेतली होती. यावेळी कामासाठी प्रति सुरक्षा रक्षक दिड लाखांची मागणी करण्यात आली.
कामापूर्वीच स्वीकारली एक लाखांची लाच
कामासाठी तक्रारदारांनी एक लाखांची लाच यापूर्वीच उभयंताना दिली होती तर 8 ऑगस्ट 2026 रोजी तक्रारदाराने वाघ व पाटील यांची भेट घेतल्यानंतर कामांसंदर्भात विचारणा केली असता उर्वरीत साडसेहा लाखांची लाच मागण्यात आली. तक्रारदाराला लाच द्यायची नसल्याने त्यांनी 11 ऑगस्ट रोजी जळगाव एसीबीकडे तक्रार दिल्यानंतर लाच पडताळणी करण्यात आली.
पारोळ्यात स्वीकारली लाच
तक्रारीच्या अनुषंगाने 11 व 12 ऑगस्ट 2026 रोजी जिल्हा परिषद, धुळे येथे पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली. आरोपींनी लाचेची रक्कम घेवून तक्रारदाराला पारोळा येथील हॉटेल ग्रीन पार्क येथे बोलावल्यानंतर सापळा रचण्यात आला. संशयित आरोपी बारकू पाटील याने तक्रारदाराकडून चार लाख 80 हजार रुपयांची लाचेची रक्कम स्वतः पंचांसमक्ष स्वीकारली. त्यानंतर एसीबीच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले व नंतर धुळे जि.प.चा फिटर व सध्या क्लार्क पदाचा पदभार असलेल्या पुरुषोत्तम वाघ यासदेखील अटक करण्यात आली. या प्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा जळगाव एसीबीचे डॅशिंग पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक रेश्मा अवतारे, पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, ग्रेडेड उपनिरीक्षक सुरेश पाटील, हवालदार सुनील वानखेडे, हवालदार किशोर महाजन, हवालदार बाळू मराठे, कॉन्स्टेबल राकेश दुसाणे, कॉन्स्टेबल सचिन चाटे, कॉन्स्टेबल प्रणेश ठाकूर, कॉन्स्टेबल मनोज पाटील आदींच्या पथकाने यशस्वी केला.
